श्रीगोंदा : नागवडे साखर कारखान्याचे संचालक केशव मगर व अण्णासाहेब शेलार यांना संचालकपदावरून अपात्र का करू नये? अशी नोटीस साखर सहसंचालकांनी बजावली आहे, त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, माजी उपाध्यक्ष केशव मगर जिल्हा परिषदेचे, अण्णासाहेब शेलार, पंचायत समिती सदस्य जिजाबापू शिंदे यांच्यात जुंपली आहे. या तिघांनी नागवडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करीत त्यांच्या विरोधात बंड पुकारले. नागवडे साखर निवडणुकीत स्वतंत्र पॅनल उभा करून नागवडे यांना रोखण्यासाठी विडा उचलला आहे.
त्यावर नागवडे यांनी केशव मगर यांना उपाध्यक्षपदावरून दूर केले. उपाध्यक्षपदी धनगर समाजातील नेते युवराज चितळकर यांची वर्णी लावून बेरजेचे राजकारण केले आहे.
राजेंद्र नागवडे यांनी नितीन वाबळे, साहेबराव महारनूर या विश्वासू सहकाऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सलग तीन बैठकांना गैरहजर असल्याचे दाखवत अण्णासाहेब शेलार व केशव मगर यांना संचालकपदावरूनच अपात्र करण्यासाठी डाव टाकला आहे. साखर सहसंचालकांनी बजावलेल्या आदेशाला स्थगिती देण्यासाठी अण्णासाहेब शेलार व केशव मगर सरकारचा आधार घेण्याची शक्यता आहे. नागवडे यांच्या या खेळीने मगर, शेलार दोघेही दुखावले गेले आहेत.
---
कोरोनाचा काळ असल्याने शासनाने एक परिपत्रक काढून संचालक मंडळाच्या ऑनलाइन बैठका घ्या. ऑनलाइन निविदा काढा, असे सूचित केले आहे. राजेंद्र नागवडेंनी काही वस्तूंची ऑनलाइन खरेदी करून माल कमाविला. मात्र, संचालक मंडळाच्या बैठका ऑनलाइन का घेतल्या
नाहीत? ते सोईनुसार वागतात. आता कारखाना निवडणुकीत ‘दूध का दूध और पाणी का पाणी’ करू.
-केशव मगर, अण्णासाहेब शेलार,
संचालक, नागवडे साखर कारखाना
---
भ्रष्टाचाराचे आरोप करायची काहींना सवयच झाली आहे. ते सलग तीन बैठकांना गैरहजर होते. ही माहिती काही सभासदांनी काढली आणि साखर सहसंचालकांकडे तक्रार केली. त्यामुळे संचालक पदावरून अपात्र करण्यासंदर्भात नोटिसा बजावल्या आहेत. चुका त्यांनी करायच्या आणि खडे दुसऱ्याच्या नावाने फोडायचे हे बरोबर नाही.
-राजेंद्र नागवडे,
अध्यक्ष, नागवडे साखर कारखाना