----------
अहमदनगर शहरात महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर नागरिक रांगेत उभे असतात आणि आतमध्ये वशिल्याने प्रवेश करून लस देण्यासाठी नगरसेवक आटापिटा करतात. त्यामुळे रांगेतील नागरिक रांगेतच उभे राहतात. जे नागरिक सहजपणे केंद्रावर जातात, त्यांना रांगेतूनच घरी परत जावे लागते. जे नगरसेवकांच्या हातापाया पडतात, त्यांना थेट लस मिळते. म्हणजे एका अर्थाने नगरसेवकांनीच ही केंद्र ताब्यात घेतली आहे. लसीकरण केंद्रावरील कर्मचारीही नगरसेवकांना विचारल्याशिवाय नागरिकांना लस देत नाहीत. याकडे आयुक्तही कानाडोळा करतात. काही नगरसेवक फोन करून सांगतात आणि काही नगरसेवक लोकांना घेऊन थेट केंद्रात घुसतात आणि आपल्या मर्जीतील लोकांनाच लस देतात. हा प्रकार काही नवीन नाही. मात्र, रांगेतील नागरिकांना अरेरावी झाली तर ते सहन कशी करणार? अशा एका नगरसेवकालाच नागरिकांनी चोप देऊन एकदाचा धडा शिकवला. मोठा गोंधळ झाला. धक्काबुक्की झाली. ती सोडविण्यासाठी काही कार्यकर्ते धावले. कोण मार खातोय आणि कोण मारतोय, तेच कळत नव्हते. लोक रात्रभर तोच व्हिडिओ पाहात होते. ‘पार्टी विथ डिफरन्स’ असे बिरुद अभिमानाने मिरविणाऱ्या पार्टीच्या अध्यक्षांना धक्काबुक्की का झाली असावी? अशा प्रश्न जो-तो विचारत होता. सगळेच म्हणतात, आम्ही वाद सोडवायला गेलो होतो, मग मारहाण झाली कोणाला? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी जो तो पुन्हा पुन्हा व्हिडिओ चाळत आहे. ‘आता बस्स’, हाच संदेश नागरिकांनी यातून दिला की नाही? अशी चर्चा मात्र लसीकरण केंद्रावर सुरू झाली.