श्रीगोंदा : उपमुख्यमंत्री अजित पवार हे शनिवारी श्रीगोंदा तालुक्याच्या दौऱ्यावर असून, कुकडी प्रकल्पातील डिंभे-माणिकडोह बोगद्याबाबत ते काय बोलतात, याकडे कर्जत, श्रीगोंदा, पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
कुकडी प्रकल्पातील येडगाव, माणिकडोह, डिंभे, पिंपळगाव जोगे, वडज या धरणांमुळे लाभक्षेत्रातील दीड लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. यामध्ये येडगाव धरणाच्या डाव्या कालव्यावर ९० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. पाणी वाटपाच्या आराखड्यात डिंभे धरणातून येडगाव धरणात सव्वासहा टीएमसी पाणी सोडण्याची तरतूद आहे. मात्र डिंभे-येडगाव कालवा खराबीमुळे डिंभेतील अवघे दोन ते अडीच टीएमसी पाणीच नगर जिल्ह्याला मिळते. इतर पाणी पुणे जिल्ह्यातच मुरविले जाते. माणिकडोह धरणातही तीन टीएमसी पाण्याची तूट असते. ते पूर्ण क्षमतेने भरत नाही. डिंभेतून मिळणारे अल्प पाणी आणि माणिकडोहमधील तूट यामुळे नगर-सोलापूरमधील शेतीचे वाळवंट होत चालले आहे.
याला पर्याय म्हणूनच डिंभे-माणिकडोह जोडबोगदा पुढे आला. या प्रकल्पाची किंमत १२० कोटींवरून ३०० कोटींच्या घरात गेली. तरीही टोलवाटोलवी सुरूच आहे. त्यामुळे यंदा तर सर्वत्र पाण्याचा सुकाळ तर कुकडी लाभक्षेत्रात दुष्काळच राहणार आहे.
भाजप-सेना युतीच्या काळात हंगा जलसेतू झाला. त्यामुळे पूर्व भागाच्या टेलपर्यंत पाणी गेले. घनश्याम शेलार यांचे प्रयत्न त्यावेळी यशस्वी ठरले. देवेंद्र फडणवीस सरकारने कुकडीच्या चार हजार कोटींच्या सुधारित विकास आराखड्याला मान्यता दिली होती. डिंभे-माणिकडोह जोडबोगद्याचे टेंडर काढण्याची प्रकिया अंतिम टप्प्यात होती. यामध्ये पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले.
या राजकीय सारिपाटात विधानसभेला कुकडी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या पारड्यात मते टाकली. त्यामुळे दिलीप वळसे (आंबेगाव), रोहित पवार (कर्जत-जामखेड), संजय जगताप (करमाळा), निलेश लंके (पारनेर), अतुल बेनके (जुन्नर) असे आमदार निवडून आले. श्रीगोंद्यात दोन्ही काँग्रेसमधील अंतर्गत धुसफुसीत राष्ट्रवादीचे घनश्याम शेलार यांचा काठावर पराभव झाला, अन्यथा येथेही राष्टवादीचाच आमदार असता. त्यामुळे आतातरी महाविकास आघाडीच्या सरकारने या बोगद्याचे काम मार्गी लागावे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. त्यातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून, ते या बोगद्याबाबत काय घोषणा करतात, याकडे लक्ष लागले आहे.
----
शेतकऱ्यांना पवारांकडून अपेक्षा
महाविकास आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते आहे. त्यामुळे त्यांनीच आता निधीची तरतूद करून डिंभे-माणिकडोह जोडबोगद्याचा प्रश्न निकाली काढावा आणि कुकडी लाभक्षेत्राला दिलासा द्यावा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.