केडगाव : १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात सहभाग घेतलेले व त्यात जखमी झालेले केडगाव येथील सेवानिवृत्त लष्करी जवान महादेव निवृत्ती सुंबे यांच्या घरी दिल्लीवरून आलेल्या अमरज्योतचे नागरिकांनी स्वागत केले.
युद्धाला ५० वर्षे पूर्ण झाल्याने ही ज्योत काढण्यात आली. केडगावमधील शाहूनगर भागात राहणारे महादेव निवृत्ती सुंबे यांचे सध्या वय ८३ आहे. मात्र, सैन्यात असताना १९७१ च्या भारत-पाकिस्तान युध्दात त्यांनी सहभाग घेतला. त्यात त्यांनी आपल्या पराक्रमाची चुणूक दाखवली. त्यांच्या हाताला गोळी लागल्याने ते जखमी झाले. या युध्दात भारताचा विजय झाला. या घटनेला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारतीय लष्कराने एक पथक तयार केले आहे. या पथकाने दिल्ली येथून अमरज्योत आणली आहे. ज्या-ज्या सैनिकांनी १९७१ च्या युद्धात सहभाग घेतला. त्या प्रत्येक जवानाच्या घरी ही अमरज्योत जाणार आहे.
दिल्लीवरून आलेल्या लष्कराच्या पथकाने केडगाव येथे महादेव सुंबे यांच्या घरी ही ज्योत आणली. केडगावकर व सुंबे परिवाराने या ज्योतीचे स्वागत केले. सुंबे यांच्या पत्नीने या ज्योतीचे पूजन केले.
----
१९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात सहभागी होण्याचे भाग्य मिळाले. त्यात मी जखमी झालो होतो. त्या घटनेला ५o वर्षे उलटले असूनही भारतीय लष्कराने याचे स्मरण ठेवीत ही ज्योत आमच्या घरी आणली. आज त्या युद्धातील प्रसंग डोळ्यासमोर उभे राहिले. छाती अभिमानाने भरून आली.
-महादेव सुंबे,
सेवानिवृत्त लष्करी जवान, केडगाव
फोटो : ०१ अमरज्योत
केडगाव येथील सेवानिवृत्त लष्करी जवान महादेव निवृत्ती सुंबे यांच्या घरी दिल्लीवरून आलेल्या अमरज्योतचे नागरिकांनी स्वागत केले.