शेवगाव : तालुक्यातील विविध विकासकामांचे प्रश्न शासन दरबारी मांडून निश्चितच मार्गी लावू, असे आश्वासन आमदार रोहित पवार यांनी येथील कार्यक्रमात दिले.
येथील बाजार समितीच्या प्रांगणात रविवारी सकाळी आठ वाजता झालेल्या कार्यक्रमात अनुसूचित जमातीच्या ४८८ लाभार्थ्यांना खावटी योजनेतून अन्नधान्य व किराणा साहित्याचे वाटप झाले. यावेळी ते बोलत होते. माजी आमदार चंद्रशेखर घुले, पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले, ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक काकासाहेब नरवडे, जिल्हा राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष संजय कोळगे, पंडित भोसले, सुधाकर लांडे, अनिलराव मडके, संजय शिंदे, कृष्णा पायघन, कैलासराव नेमाणे आदी उपस्थित होते.
जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या माध्यमातून वीज व पाण्याचा प्रश्न निकाली काढू, असे म्हणत स्थानिक लोकप्रतिनिधी कामे करण्यात फारसे सक्रिय दिसत नाहीत. उलट राष्ट्रवादीचे पदाधिकारी अधिक सक्रिय होऊन जनतेची कामे करताना दिसत आहेत, असा चिमटा आमदार मोनिका राजळेंचे नाव न घेता राेहित पवार यांनी काढला.
तालुक्यातील बालमटाकळी येथे एका कारखान्याच्या उद्घाटनालाही पवार यांनी हजेरी लावली. जेव्हा जेव्हा संकटे येतात तेव्हा राष्ट्रवादी पुढाकार घेऊन मदत कार्य करते. सध्याचा काळ कठीण आहे. शेती, उद्योग, व्यवसाय क्षेत्र मोठ्या अडचणीत आहे. इच्छा असूनही राज्य सरकारला विकासकामे करता येत नाहीत, अशी खंत पवार यांनी व्यक्त केली.