बामसेफच्या ३७ व्या राष्ट्रीय अधिवेशनाचे शनिवारी माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी मेश्राम बोलत होते. काेरोनामुळे हे अधिवशेन यंदा व्हर्चुअल होत आहे. मेश्राम म्हणाले, समाज एकत्रच आहे. मात्र, थर्ड पार्टी आम्हाला विभागत आहे. ही बाब वंचितांनी समजून घेतली तर विभागलेला समाज पुन्हा एकत्र येऊ शकतो. एका टप्प्यावर जेव्हा हा प्रयत्न यशस्वी होईल तेव्हा आपण प्रस्थापित व्यवस्थेतून स्वतंत्र होऊ. आम्ही २६ जानेवारीला जी राजकीय लोकशाही स्वीकारली त्यात एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य आहे. आज मात्र ज्यांच्याकडे आर्थिक सत्ता आहे ते मते खरेदी करत आहेत. याविरोधात आपल्याला एकत्र लढा द्यावा लागेल. असे आवाहन मेश्राम यांनी केले.
सावंत म्हणाले, आज लोकशाही धोक्यात आली आहे. आम्ही या देशाचे मूलनिवासी नागरिक आहोत. आम्ही जाती आणि गटात विभागलेले आहोत. हेच या देशातील दुश्मनांना अपेक्षित आहे. त्यामुळे आपल्याला एकत्र येऊन लढा द्यावा लागेल आणि लोकशाही विरोधी व्यवस्था खाली खेचावी लागेल, असेे ते म्हणाले. २९ डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन सुरू राहणार असून नागरिकांना हे अधिवेशन वामन मेश्राम या फेसबुक पेजवर पाहता येणार असल्याचे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मिसाळ यांनी सांगितले.