पारनेर : नगरपंचायतीच्या नळपाणीपुरवठा योजनेतून येणाऱ्या पाण्याची वेळ व तारीख मोबाईलवर एसएमएसद्वारे कळविण्याचा अभिनव उपक्रम पारनेरमधील प्रभाग बारामध्ये सुरू होणार आहे. यामुळे पाणी भरण्यासाठी व्यावसायिक, नोकरदार मंडळी व नागरिकांची धावपळ थांबणार आहे. अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम असावा. पारनेर शहरात नगरपंचायतीच्यावतीने नळपाणीपुरवठा योजनेतून घरोघरी नळ जोड देऊन पाणीपुरवठा होतो. शहराला हंंगा तलाव, मनकर्णिका नदीवरील विहीर व टंचाई कालावधीत सुपा एमआयडीसी या स्त्रोतांमधून पाणी घेऊन शहरातील पाण्याच्या टाक्यांमध्ये पाणी साठवून नंतर पाणीपुरवठा केला जातो. परंतु अनेकदा हंगा तलाव किंवा मनकर्णिका भागातील पाणीउपसा होणाऱ्या ठिकाणी वीजपुरवठा दिवसभर बंद असतो किंवा पंप जळाल्याने पाणीपुरवठ्याच्या नियोजनात विस्कळीतपणा येतो. त्यामुळे पाणी सोडताना नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. तसेच अवेळी पाणी आल्याने नागरिकांची धावपळ उडते. हा त्रास वाचविण्यासाठी प्रभाग बारामधील नगरसेविका शशिकला शेरकर यांनी याबाबत उपाययोजना करण्यासाठी प्रभागातील युवक संघटनेचे प्रमुख अॅड.गणेश कावरे, प्रवीण औटी, कल्याण थोरात, सचिन बडवे, वैभव बडवे, उदय शेरकर, प्रमोद गोळे, सचिन मते व महिलांची बैठक घेतली. बैठकीत नळाला पाणी कोणत्या वेळी व कोणत्या तारखेला येणार आहे, याचे नियोजन करण्याची गरज असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. प्रभाग १२ मध्ये नागेश्वर गल्ली, पूर्णवाद परिसर, बोळकोबा गल्ली, कावरे गल्ली, सेनापती बापट स्मारक परिसर, शेरकर गल्ली, सेनापती बापट रस्ता हा परिसर येतो. यामध्ये पाणी सोडण्याचा कोणता भाग येतो, त्यानुसार नियोजन करावे व संबंधित भागातील नागरिकांना त्याचा संदेश मोबाईलवर देण्यात यावा, असे बैठकीत ठरविण्यात आले. दोन ते तीन आठवड्यात या अभिनव उपक्रमाचे पारनेर नगरपंचायतीत सादरीकरण होईल. (तालुका प्रतिनिधी)
मोबाईलवर पाणी पुरवठ्याचे नियोजन
By admin | Updated: December 16, 2015 23:09 IST