अहमदनगर : शहरात वारंवार विस्कळीत होणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या निषेधार्थ सेनेने महापालिकेवर मोर्चा काढत हल्लाबोल केला. मनपात माठ फोडून आयुक्तांना घेराव टाकत माठ भेट देण्यात आला. येत्या १२ तासांत शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करावा अन्यथा अधिकाऱ्यांना त्यांच्या खुर्चीवर बसणे मुश्कील करू असा इशारा आमदार अनिल राठोड यांनी दिला. शहरात गत चार दिवसांपासून पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्याचा निषेध म्हणून चितळे रस्त्यावरील शिवालयापासून आमदार अनिल राठोड यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर मोर्चा निघाला. मोर्चेकरी शिवसैनिक मनपा कार्यालयात जाऊ नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करून प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते. परंतु शिवसैनिकांनी गेट उचकटून महापालिकेत प्रवेश केला. मोर्चेकरी एकदम आयुक्तांच्या दालनात शिरले. त्यांना घेरावो टाकत त्यांच्यावर चोहोबाजूने प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. यामुळे एकच गोंधळ उडाला. वीज पुरवठा व इतर कारणांशी आम्हाला घेणे-देणे नाही, आम्हाला पाणी मिळाले पाहिजे अशी भूमिका मोर्चेकऱ्यांनी घेतली. सेनेची सत्ता असताना तत्कालीन महापौर शीला शिंदे यांनी उन्हाळ्यात शहरात मुबलक पाणी पुरवठा केला. यंदा धरणात पुरेसे पाणी असूनही नियोजनाअभावी नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ आली आहे. मनपाचे व्हॉलमन नागरिकांना योग्य उत्तरे देत नाहीत. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. शहर प्रमुख संभाजी कदम, नगरसेवक अनिल शिंदे, विक्रम राठोड, भगवान फुलसौंदर, अरुणा गोयल, निर्मला धुपधरे, सुषमा पडोळे, मनीषा बारस्कर, मालन ढोणे, दिगंबर ढवण यांच्यासह शिवसैनिक मोर्चात सहभागी झाली होते. (प्रतिनिधी)अहमदनगर : आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सत्ताधाऱ्यांच्या नावाने सेनेने आकांडतांडव सुरू केले आहे. वादळ, पाऊस,झाडांच्या पडझडीमुळे वीज पुरवठा खंडीत होणे ह्या गोष्टी महापालिकेच्या हातातील नाहीत हे न कळण्याजोग्या सेनेने त्यांच्याकडे सत्ता असताना पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी काय केले? असा सवाल महापौर संग्राम जगताप यांनी पत्रकार परिषदेत केला. फेज टू योजना आघाडीनेच मंजूर करून आणली. पण तीही युतीला पूर्ण करता आली नाही. त्यांच्याच कार्यकाळात (जून २०१३) योजनेच्या ठेकेदाराची मुदत संपली. मुदतीत काम न झाल्याने ठेकेदारांवर कारवाई होणे अपेक्षित होते. पण त्यांनी साधी नोटीसही ठेकेदाराला दिली नाही. उलट त्याला मुदतवाढ दिली. पाईपलाईन टाकताना ठेकेदाराला काय अडचणी येतात, हे कधी पाहिले नाही. पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी काय करायला हवे यासाठी लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांनी प्रयत्न केले पाहिजे. पण त्यांना पाणी योजनाच माहिती नाही ते काय प्रयत्न करणार असा टोमणा जगताप यांनी राठोड यांना मारला. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून युतीकडून राजकीय स्टंटबाजी सुरू असल्याचे ते म्हणाले. पाणी प्रश्नांवर युतीने राजकारण करू नये. पाणी पुरवठा विस्कळीत होण्याची कारणे समावून घ्यावे असा सल्लाही त्यांनी दिला. पाणी योजना त्यांना पूर्णपणे समजलेली दिसत नसल्याचा टोला त्यांनी हाणला. मी महापौर असताना शासनाकडून या योजनेला मंजुरी आणली. त्यानंतर त्यांच्या कार्यकाळात योजनेचे काम ठप्प झाले. पुन्हा मी महापौर झालो. त्यानंतर ठेकेदाराला काम पूर्ण करण्यासाठी कालमर्यादा घालून देण्यात आली. त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली. मुळानगर येथे विद्युतभार वाढविण्यास मंजूरी मिळवून आणली. एक्सप्रेस फिडरसाठीचे अंदाजपत्रक तयार करून जिल्हा नियोजनकडे पैसे मागितले. ज्या भागात पाण्याच्या तक्रारी आल्या तेथे स्वत: जावून पाहणी केली त्या सोडविल्या. आता योजना अंतिम टप्प्यात असून ती पूर्ण करणारच असा ठाम विश्वास जगताप यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)शहरात गत चार दिवसांपासून वादळी पाऊसाने वीज पुरवठा खंडीत होत असल्याने जलसंकट ओढावले आहे. अशाप्रसंगी सत्ताधारी व विरोधक दोघांनीही एकत्र येऊन त्यावर उपाय शोधणे गरजेचे आहे. पण ते सोडून विरोधक मोर्चा काढून तर त्याला प्रत्युत्तर म्हणून सत्ताधारी टोमणे मारत आहेत. पाणी प्रश्नाला या राजकारण्यांनी राजकीय तवंग आणला आहे. युतीच्या सत्तेच्या अन् आता आघाडीच्या काळातही पाण्याची अवस्था काही वेगळी नाही. गत अनेक वर्षापासून पाण्याचा हा प्रश्न आहे. शहराची तहान फक्त मुळा धरणातील पाण्यावर अवलंबून असून अन्य पर्यायी व्यवस्था करण्याची गरज आहे.
पाण्याला राजकीय तवंग!
By admin | Updated: June 8, 2014 00:36 IST