१०८ टँकरने पाणी पुरवठा :सहा गावांचे टँकरचे प्रस्तावपाथर्डी : दिवसेंदिवस तालुक्यात पाणी टंचाई मोठ्या प्रमाणावर जाणवू लागली असून ग्रामीण भागातील जनता टॅँकरच्या प्रतीक्षेत आहे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. पाथर्डी तालुका सततचा दुष्काळी, ऊस तोडणी कामगारांचा तालुका म्हणून ओळखला जातो. निसर्गाची अवकृपा या तालुक्याला नवीन नसली तरी पिण्याचे पाणी मात्र जिवावरची कसरत करूनच मिळवावे लागते. तालुक्यात सध्या तीव्र पाणी टंचाई जाणवू लागली असून टॅँकर सुरू करा, या मागणीसाठी गावोगावचे नागरिक पंचायत समिती, तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत. सध्या तालुक्यात १०८ टॅँकरद्वारे ४८ गावे व ३३० वाड्या-वस्त्यांना पाणी पुरवठा चालू आहे. सहा गावचे टॅँकरचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत असून कोठेही पाणी नसल्यामुळे पाण्यासाठी गावोगावचे नागरिक, महिला व लहान मुले रानोमाळ फिरत असल्याचे दिसत आहे. पाणी, रोजगार हमीच्या कामांसाठी आंदोलने होत आहेत. अधिकारी मात्र कागदी घोडे नाचविण्यात दंग असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.ग्रामीण भागात पाणी पातळी खोलवर गेल्याने कुठेही पाणी नाही. माणसांना पिण्याच्या पाण्याचे हाल तर जनावरांचे काय, या भीतीने अनेक शेतकऱ्यांनी जनावरे विक्रीसाठी काढली आहेत, परंतु गिऱ्हाईक नसल्याने त्यामध्ये मोठी अडचण येत आहे. त्यामुळे जनावरे जगवायची कशी, अशी भीती शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. गेल्यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने तालुक्यात पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. (तालुका प्रतिनिधी)‘रोहयो’ कामांची मागणीसध्या ऊसतोडणी कामगार गावाकडे परतल्यामुळे तालुक्याच्या पूर्व भागात पाण्याची परिस्थिती भीषण बनली आहे. खरीप व रब्बी पिके गेल्यामुळे शेतकऱ्यांकडे पैसा नाही. त्यामुळे रोजगार हमीची कामे सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
पाथर्डी तालुक्यात पाणी टंचाईचे सावट गडद
By admin | Updated: April 15, 2016 23:11 IST