अहमदनगर : नगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात मोठ्या प्रमाणात दूध व्यवसाय केला जातो़ अन्नपदार्थांमध्ये दूध हा महत्त्वपूर्ण घटक असून, ग्राहकांना मिळणारे दूध १०० टक्के शुद्ध असणे गरजेचे आहे़ विस्ताराने मोठ्या असलेल्या जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी जाऊन तपासणीसाठी दुधाचे नमुने घेणे शक्य होत नाही़ त्यामुळे येत्या काही दिवसांत दूध तपासणीसाठी फिरत्या प्रयोगशाळेची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे अन्न, औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त बालू ठाकूर यांनी सांगितले़ ‘प्रशासन ते जनता संवाद’ या ‘लोकमत’ च्या उपक्रमात ते बोलत होते़ अन्नपदार्थ विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांकडून लोकांना शुद्ध अन्न मिळावे या उद्देशातूनच अन्न, औषध प्रशासनाची स्थापना झालेली आहे़ अन्न, औषध प्रशासनाच्या येथील कार्यालयात सध्या मनुष्यबळ कमी असले तरी हॉटेल, दूध संकलन केंद्र, शुद्ध पाण्याचे कारखाने, फळे व भाजीपाला यांचे नियमित नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविले जातात़ पदार्र्थांमध्ये दोष आढळून आल्यास कायद्याप्रमाणे तातडीने पुढील कारवाई केली जाते़ मागील तीन महिन्यांत शहरासह जिल्ह्यातील ९५ हॉटेलची तपासणी करून दोषी आढळून आलेल्या तीन हॉटेलचालकांचे परवाने रद्द केले असल्याचे ठाकूर यांनी सांगितले़ अन्न विभागाने कारवाई केलेल्या ३२७ जणांवर सध्या न्यायालयात खटले सुरू आहेत़ अन्न, औषध प्रशासनाच्या नाशिक आणि औरंगाबाद विभागाकडे दूध तपासणीसाठी फिरती प्रयोगशाळा आहे़ अशी प्रयोगशाळा प्रत्येक जिल्ह्याला देण्याचे शासनाचे नियोजन असल्याचे ठाकूर म्हणाले़
दूध तपासणीसाठी फिरती प्रयोगशाळा
By admin | Updated: May 25, 2016 23:44 IST