राजूर/अकोले : मुळा आणि भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर कमी झाला असला तरी सलग पाच सहा दिवस झालेल्या संततधार पावसामुळे भंडारदरा परिसरातील वाकी आणि मुळा खोऱ्यातील कोथळे येथील लघुपाटबंधारे तलाव पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागले आहेत.महिनाभराच्या विश्रांतीनंतर या दोन्ही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे आगमन झाले त्यामुळे एक महिन्यानंतर हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी असणारा आंबित येथील १९२ दलघफू क्षमतेचा लघुपाटबंधारे तलाव भरून वाहू लागला. त्या पाठोपाठ रविवारी याच खोऱ्यातील १८२ दलघफू क्षमतेचा कोथळा येथील लघुपाटबंधारे तलावही ओव्हर फ्लो झाला. मुळा खोऱ्यातही पावसाचे प्रमाण काहीशे कमी झाल्यामुळे मुळाचा विसर्गही कमी झाला असून, रविवारी सकाळी तो ३ हजार ३१२ क्युसेक इतका होता.कळसूबाई शिखराच्या परिसरातही जोरदार पावसाच्या सरी बरसल्यामुळे भंडारदराजवळ असणारा वाकी येथील ११२ दलघफू क्षमतेचा मध्यम लघुपाटबंधारे तलाव भरून वाहू लागला. त्यामुळे प्रवरेची उपनदी म्हणून समजली जाणारी कृष्णवंतीही वेगाने धावू लागली आहे. आदिवासी पट्ट्यात पाऊस पडत असल्याबाबत समाधान व्यक्त होत असले तरी पूर्व भाग, आढळा खोरे, कोतूळ पट्ट्यात अद्यापही पावसाची प्रतीक्षा आहे. (वार्ताहर)पावसाची आकडेवारी शनिवारचा पाऊस व कंसात यावर्षी पडलेला एकूण पाऊस मिली मिटरमध्ये घाटघर- ४५ (१०८९), रतनवाडी- ८० (१०७९), पांजरे- ४५ (५११), वाकी- ५४ (३९३), भंडारदरा- ४५ (४०२), कोतूळ ५ (५०), निळवंडे- ४ (६०), आढळा- ० (१४), अकोले- ० (१३) पाऊस पडला. मुळाने ओलांडला ६ टीएमसीचा टप्पा राहुरी : पाणलोटक्षेत्रात सुरू असलेल्या कमी-अधिक पावसामुळे मुळा धरणाने आता ६००० दशलक्ष घनफुटाचा टप्पा पार केला आहे. धरणात ३२१३ क्यूसेकने पाण्याची आवक सुरू आहे. हरिश्चंद्रगडावर हलक्या ते मध्यम पावसाच्या सरीने हजेरी लावली़मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर अद्याप जोरदार पावसाने हजेरी न लावल्याने पाण्याची पातळी धिम्या गतीने वाढत आहे. रविवारी दिवसभर धरणाच्या पाणलोट व लाभक्षेत्रात ढगाळ वातावरण होते़ लाभक्षेत्रावर पाऊस न पडल्याने शेतकरी वर्गाचे लक्ष आभाळाकडे वेधले आहे़
वाकी तलाव ओव्हरफ्लो
By admin | Updated: July 21, 2014 00:28 IST