शिर्डी : साईनगरी अनलॉक झाली असली तरी साईमंदिर उघडल्याशिवाय ती खऱ्या अर्थाने अनलॉक होणार नाही. यामुळे शिर्डीकर व भाविकांबरोबरच आता साईमंदिरालाही अनलॉकची प्रतीक्षा आहे. शिर्डीपाठोपाठ येत्या काही दिवसांतच साईमंदिराची कवाडेही खुली होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
शिर्डी व पंचक्रोशीतील हजारो कुटुंबांचा रोजगार साईमंदिरावर अवलंबून असल्याने मंदिर उघडल्याशिवाय त्यांची रोजीरोटी सुरू होणार नाही. येथे साडेसातशेहून अधिक हॉटेल्स, दोनशेहून अधिक रेस्टाॅरंट आहेत. यातील नव्वद टक्क्यांहून अधिक कर्जाच्या बोजाखाली आहेत. गेल्यावेळी लॉकडाऊन उठल्यानंतर बऱ्याच दिवसांनी साईमंदिर उघडले. थकलेले वीज बिलही व्यावसायिक भरू शकले नाही तोवर दोन महिन्यांत पुन्हा लॉकडाऊन सुरू झाले. त्यामुळे गेल्या सव्वा वर्षापासून शिर्डीतील अर्थचक्र पूर्ण रुतलेले आहे. यामुळे साईमंदिरावर अवलंबून असलेल्या व्यवसायातील हजारो जण बेरोजगार झाले आहेत. अनेक जण गावाकडे परतले तर काही जण मिळेल तो कामधंदा करून पोट भरत आहेत. यामुळे ग्रामस्थांनाही मंदिर उघडण्याची प्रतीक्षा आहे.
राज्य सरकारने अनलॉक प्रक्रिया सुरू करताना रुग्णसंख्येनुसार जिल्ह्यांचे प्राधान्यक्रम ठरवले. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार याच धर्तीवर टप्प्याटप्प्याने लहान मंदिरे किंवा सगळे जिल्हे अनलॉक झाल्यावर मोठी मंदिरे उघडली जाऊ शकतात. सरसकट निर्णय न घेता मंदिराला भाविक कुठून येतात, किती संख्येने येतात, तसेच आगामी सणवार विचारात घेऊन मंदिरांची अनलॉक प्रक्रिया राबविली जाऊ शकते. गावपातळीवरील मंदिरे संबंधित गावातील रुग्णसंख्येनुसार येत्या पंधरा ते वीस जूनदरम्यान खुली होऊ शकतात. त्यानंतर जिल्हास्तरावरील, राज्यपातळीवरील व आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या मंदिरांचा क्रम ठरविला जाऊ शकतो. याशिवाय कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेत लहान मुलांना त्रास होण्याची शक्यता गृहित धरून गेल्या वर्षाप्रमाणे मुलांना बंदी, मर्यादित दर्शन आदी निर्णयही शासन घेऊ शकते. मात्र, गेल्या वेळचा अनुभव व भाविकांचा दबाव लक्षात घेऊन या महिनाअखेर किंवा पुढील महिन्याच्या मध्यावर साईमंदिर अनलॉक होऊ शकते. मात्र, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी व मंदिर व्यवस्थापनाशी चर्चा करून शासन निर्णय घेणार असल्याचे समजते.
-----------
साईमंदिर उघडण्यासाठी आम्ही पूर्ण तयारी करून ठेवलेली आहे. राज्य शासनाचा आदेश आल्यानंतर तात्काळ मंदिर दर्शनासाठी खुले करता येईल.
- कान्हूराज बगाटे, सीईओ, साईसंस्थान