दहा हजार मतदार : दोन केंद्रांवर नऊ ठिकाणी व्यवस्था; सेना-राष्ट्रवादीत सरळ लढतअहमदनगर : आगामी महापौरपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रतिष्ठेच्या ठरलेल्या महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ च्या पोटनिवडणुकीसाठी रविवारी मतदान होत आहे. एका जागेसाठी तीन उमेदवार मैदानात असून १० हजार ५०० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. शिवसेनेची राष्ट्रवादीशी सरळ लढत असल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. प्रभाग क्रमांक ३ चे नगरसेवक विजय भांगरे यांच्या निधनाने ही जागा रिक्त झाली होती. या जागेसाठी भांगरे यांच्या पत्नी प्रतिभा भांगरे (शिवसेना), कृष्णा गायकवाड (राष्ट्रवादी काँग्रेस) आणि अनिता दळवी (अपक्ष) अशी तिरंगी लढत होत आहे. आगामी महापौरपदाच्या निवडणुकीसाठी ही जागा महत्त्वाची असल्याने शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच लागली आहे. उन्हाच्या कडाक्यात प्रचारफेरीऐवजी समक्ष भेटीवर उमेदवारांनी भर दिला होता. सेनेने भावनिकतेचा तर राष्ट्रवादीने विकासाचा मुद्दा प्रचारामध्ये घेतला आहे.नूतन मराठी शाळा व नय्यर शाळेत मतदान केंद्र आहेत. नय्यर शाळेत पाच तर मराठी शाळेत चार ठिकाणी मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदानासाठी ६० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मतदारांना निर्भयपणे मतदान करता यावे, यासाठी बूथवर जाईपर्यंत प्रत्येक मतदाराचे व्हिडीओ चित्रीकरण केले जाणार आहे. मतदान केंद्राबाहेर व आतमध्ये असे दोन कॅमेरे असणार आहेत. मतदानाच्या दोन केंद्रावर ९ ठिकाणी मतदान करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपायुक्त अजय चारठाणकर यांनी प्रशासकीय तयारी पूर्ण केली आहे. उन्हाचा कडाका पाहता मतदान केंद्रावर शामियाना उभारण्यात येणार आहे. तेथे पिण्याच्या पाण्याची सुविधा केल्याचे चारठाणकर यांनी सांगितले. दरम्यान पोटनिवडणुकीत कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तोफखाना पोलीस ठाणे, जिल्हा विशेष शाखेचा पुरेसा बंदोबस्त तैनात केला आहे.
पोटनिवडणुकीसाठी आज मतदान
By admin | Updated: April 16, 2016 23:14 IST