केडगाव : नगर तालुक्यातील जेऊर येथील कोविड सेंटरची ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पाहणी करून सेंटरला औषधांसाठी आमदार निधीतून मदत करणार असल्याचे सांगितले. जेऊरमध्ये ११६ कोरोनाबाधित सक्रिय रुग्ण आहेत. तनपुरे यांनी येथील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक केले. कोरोनाला आळा घालण्यासाठी योग्य ती कारवाई करण्याबाबत सूचना केल्या. येथील रुग्णांशी चर्चा करून त्यांना न घाबरता आजाराला सामोरे जाण्याचा सल्ला दिला. जेऊर येथे ७५ बेडचे कोविड सेंटर सुरू करण्यात आलेले आहे. त्यामुळे गावातील कोरोनाबाधित रुग्णाला घरी न ठेवता कोविड सेंटरलाच दाखल करण्याचे आदेश तनपुरे यांनी दिले. येथे ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांच्याकडे करण्यात आली. इमामपूर सरपंच भीमराज मोकाटे यांनी ग्रामपंचायतीला कोरोना निधी देण्याबाबतचे निवेदन दिले.
यावेळी गटविकास अधिकारी सचिन घाडगे, तालुका आरोग्य अधिकारी ज्योती मांडगे, मंडळाधिकारी वृषाली करोसिया, ग्रामविकास अधिकारी सविता लांडे, तलाठी आगळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश कर्डिले, उपसरपंच श्रीतेश पवार, अण्णासाहेब मगर, माजी उपसरपंच बंडू पवार, इमामपूर सरपंच भीमराज मोकाटे, डोंगरगण माजी सरपंच कैलास पटारे, ग्रामपंचायत सदस्य गणेश तवले, मुसा शेख उपस्थित होते.