सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा येथील नागरिकांनी कोरोना साखळी तोडण्याचा निर्धार केला आहे. विनाकारण बाहेर न पडणे, बाहेर पडल्यास मास्क लावणे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे, सॅनिटायझरचा वापर करणे आदी सवयी बहुसंख्य नागरिकांच्या अंगवळणी पडल्या आहेत. जवळपास सर्वच नागरिक स्वयंशिस्त पाळत असल्याने शहरात नेहमी गर्दी असलेल्या ठिकाणी बहुधा शुकशुकाट दिसतो.
एमआयडीसी कामगारांचे वास्तव्य, उद्योजक, व्यापारी यांची निवासस्थाने, इतरत्र नोकरी, परंतु वाहतूक, दळणवळण सुविधेमुळे वास्तव्यास योग्य वाटणारे सुपा गाव, मोठा आठवडा बाजार, शैक्षणिक सुविधा यामुळे सुप्याची लोकसंख्या झपाट्याने वाढली. परिणामी कोरोनाच्या संसर्गाचा धोका वाढला व पॉझिटिव्ह रुग्ण संख्या झपाट्याने वाढू लागल्याने काळजाचा ठेका चुकविणारी परिस्थिती निर्माण होत आहे. आता यातून सुपेकरांनीच मार्ग काढण्यासाठी स्वतःला शिस्त लावली आहे. पोलीस कारवाई, दंड, नियम, कायदा यासह कोरोनाची साखळी तोडण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.
बसस्थानक चौक वगळता अन्यत्र पोलीस नसतानाही ग्रामस्थ मात्र नियमांचे पालन करताना दिसतात. कोरोनाची भीती म्हणा किंवा कोरोना चेन ब्रेक करण्याचा निर्धार संपूर्ण सुपा गाव, तेथील गर्दीची ठिकाणे, बाजारपेठ, हॉटेल्स, चहाच्या टपऱ्या, हारांची दुकाने, बेकरी केंद्र इतकेच काय वाईन शॉप ह्या सगळ्या ठिकाणी शुकशुकाट दिसत आहे.
सध्या भाजीपाला, फळे यांची मागणी वाढली असली तरी लोक दुरूनच दरांची चौकशी करून माल घेतात, असे फळविक्रेता दिनेश जाधव यांनी सांगितले. दुधाबाबतही ग्रामस्थ जागरूक असून रतीबाचे दूध घेताना व देताना दोघांच्याही तोंडास मास्क पहावयास मिळत असल्याने आता कोरोनाची साखळी तोडण्यात आपणास यश मिळेल, असा आत्मविश्वास तरुणाई व्यक्त करत आहे.
सुप्यातील नव्याने उभे राहिलेल्या सुपा हाईट या व्यापारी संकुलात मोठ्या प्रमाणावर खरेदीसाठी नेहमी तरुणांची गर्दी दिसायची. आता मात्र येथेही गर्दी नसते.
----
वारंवार सूचना कराव्या लागत नाहीत..
सकाळच्या निर्धारित वेळेत भाजीपाला, दूध, किराणा आदी अत्यावश्यक सेवा सुरू असताना हळूहळू त्या कामानिमित्त ग्रामस्थ बाहेर आले तरी आता प्रत्येकाच्या तोंडावर मास्क आवर्जून दिसतो. वस्तूंची खरेदी करताना गर्दी होऊ नये यासाठी दुकानदारांनी ग्राहकांसाठी घालून दिलेल्या फिजिकल डिस्टनसिंगच्या बॉक्समध्येच थांबून लोक आपापले व्यवहार करताना दिसतात. त्यासाठी आता वारंवार सूचना व आवाहन करावे लागत नसल्याचे साईश्रद्धा किराणा मालाचे संचालक संदीप भुजबळ यांनी सांगितले.
---
२२ सुपा
सतत मोठी वर्दळ असणाऱ्या सुपा हाईट व्यापारी संकुल परिसरात लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून असा शुकशुकाट असतो.