लोकमत न्यूज नेटवर्क
दहिगावने : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू केले आहेत. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर दुकाने कडकडीत बंद आहेत. मात्र, सकाळी चौकाचौकांत गप्पांचे फड नेहमीप्रमाणेच रंगलेले पहायला मिळत आहेत. दहिगावने, भावीनिमगाव, शहरटाकळीसह शेवगाव तालुक्यातील ग्रामीण भागातीलही परिस्थिती चिंताजनक आहे. याला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून घातली जाणारी गस्तही निष्फळ ठरत आहे.
मागीलवर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासनाला गावागावांतील आपत्ती व्यवस्थापन समित्या मदत करीत होत्या. या समितीच्या वतीने नागरिकांना घराबाहेर न निघण्याच्या, जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीवेळी गर्दी न करण्याचे वेळोवेळी आवाहन करण्यात येत होते. गावात पहाराही देण्यात येत होता. त्यामुळे गर्दी नियंत्रणात राहत होती. मात्र, सद्यस्थितीत या समित्याच कार्यान्वित नसल्याने परिस्थिती नियंत्रणात आणणारी यंत्रणाच उपलब्ध नाही. त्यामुळे अनेक गावांतील चौकाचौकांत नागरिक गर्दी करीत आहेत. विशेषतः सकाळी ७ ते ९ आणि संध्याकाळी ६ ते ९ यावेळेत गावातील चौकांमध्ये मोठी गर्दी होत आहे. यामुळे अबालवृद्धांचा जीव टांगणीला लागला असून ग्रामस्थ चिंता व्यक्त करीत आहेत. दरम्यान, पोलिसांनी दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला पाहिजे. प्रशासनाने कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांची शोधमोहीम हाती घेऊन त्यांची कोरोना चाचणी करावी, अशी मागणी आरोग्यमित्रांकडून होत आहे.
...
नागरिकांना गर्दी कमी करण्याचे अनेकदा आवाहन केले. समजावून सांगितले आहे. मात्र, गावातील प्रशासकीय अधिकारी व पदाधिकाऱ्यांना लोक जुमानत नाहीत. पोलीस दुपारच्या वेळी गस्त घालण्यास येतात. त्यावेळी ऊन असल्याने गावागावांत शुकशुकाट असतो. त्यामुळे पोलीस प्रशासनाने सकाळी ७ ते ९ आणि सायंकाळी ६ ते ८ या वेळेतील गस्तींची संख्या वाढवून नियम मोडणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करावी.
-सुभाष पवार, सरपंच, दहिगावने, ता. शेवगाव.
...
शेवगाव तालुक्यात मागील दहा दिवसांत १०४५ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असताना बेफिकिरी बाळगणारे नागरिक समाजासाठी आणखी घातक ठरत आहेत. नागरिकांच्या वर्तनबदलाने कोरोनाची साखळी तुटू शकते. त्यामुळे प्रशासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करा.
-डॉ सलमा हिराणी, तालुका आरोग्य अधिकारी, शेवगाव.
...