बोधेगाव : बोधेगाव (ता़ शेवगाव) येथे किरकोळ बाचाबाचीतून भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन काकडे व राष्ट्रवादीचे माजी सरपंच रामजी अंधारे यांच्यात पोलीस चौकीसमोरच भर रस्त्यात शनिवारी जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीमुळे गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. या राजकीय हाणामारीला घाबरुन बाजारपेठेतील व्यावसायिकांनी दुकाने बंद केली. याप्रकरणी काकडे-अंधारे यांच्यासह २० ते २५ जणांवर शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सूत्राकडून समजलेली माहिती अशी, भाजपचे नेते माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन काकडे व राष्ट्रवादीचे नेते माजी सरपंच रामजी अंधारे यांच्यामध्ये शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास बाजारपेठेत भररस्त्यावर शाब्दिक वाद झाले. या वादातून दोघांमध्ये तुफान हाणामारी झाली. त्यात एकजण जखमी झाला आहे. या हाणामारीमुळे दोन्ही गटाच्या समर्थक एकमेकांसमोर आले. बघ्यांचीही मोठी गर्दी झाली. या हाणामारीची बातमी काही सेकंदातच गावभर पसरली. त्यामुळे व्यापा-यांनी घाबरुन दुकाने बंद केली.बोधेगाव दूरक्षेत्रातून या घटनेची माहिती शेवगाव पोलीस ठाण्याला देण्यात आली. शेवगावहून सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मगर, उपनिरीक्षक सुहास हट्टेकर फौजफाटा घेवून तासाभराने घटनास्थळी दाखल झाले. गावात फेरफटका मारला गेला. दुपारनंतर हळूहळू दुकाने उघडण्यात आली.
शेवगाव पोलीस ठाण्यात पोलीस नाईक रामेश्वर घुगे यांच्या फिर्यादीनुसार पोलीस ठाण्यासमोर जमावबंदी आदेशाचा भंग करून हाणामारी केल्याप्रकरणी नितीन मनोहर काकडे, सुधाकर तोडमल, रामा अंधारे, गणेश अंधारे यांच्यासह दोन्ही बाजूच्या २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार बाबासाहेब बोरुडे करीत आहे.
वर्चस्वाचा वाद....?महिनाभरावर ग्रामदैवत साध्वी बन्नोमा दर्गा यात्रौत्सव आला असून त्यापाठोपाठ ग्रामपंचायत निवडणूक नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणार आहे. त्यामुळे काकडे-अंधारे यांच्यातील वादाला वर्चस्व सिद्ध करण्याची झालर असल्याची चर्चा गावात रंगली आहे. पोलिसांकडून मात्र, या वादाचे कोणतेही कारण अद्याप स्पष्ट करण्यात आले नसून, या दोघांनीही आता तोंडावर बोट ठेवले आहे. त्यामुळे जनतेत उलटसुलट चर्चा रंगली आहे.-----------------पोलिसावरच बघ्याची भूमिका घेण्याची वेळबाजारपेठेत तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. बोधेगाव पोलीस दूरक्षेत्रासमोरच हा प्रकार घडला़ त्यावेळी येथे एकच पोलीस कर्मचारी उपस्थित होता. त्यामुळे या पोलीस कर्मचा-याला ही हाणामारी रोखता आली नाही. पुरेशी कुमक नसल्यामुळे या पोलिसावरच चक्क बघ्याची भूमिका घेण्याची वेळ आली.