भेंडा : नेवासा तालुक्यातील भेंडा-कुकाणा व इतर सहा गावांच्या पिण्याचे पाणी प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेच्या व्यवस्थापनासाठी स्थापन केलेल्या श्री संत ज्ञानेश्वर संयुक्त पाणी व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी भेंडा बुद्रूकच्या सरपंच वैशाली शिवाजी शिंदे, उपाध्यक्षपदी आंतरवालीचे सरपंच संदीप काकासाहेब देशमुख, सचिवपदी कुकाणा ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी आर. एन. गायके यांची निवड झाली.
भेंडा बुद्रूक येथे लोकनेते मारुतराव घुले पाटील यांच्या दूरदृष्टीतून वीस वर्षांपूर्वी भेंडा बुद्रूक, भेंडा खुर्द, कुकाणा, तरवडी, चिलेखनवाडी व आंतरवाली सहा गावांसाठी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना सुरू झाली. दुष्काळात या पाणी योजनेतून नेवासा तालुक्यातील ५० टक्के गावांना टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. सक्षमपणे सुरू असलेल्या आणि नफ्यात असलेल्या जिल्ह्यातील काही निवडक पाणीपुरवठा योजनेपैकी ही एक योजना आहे.
अलिकडेच भेंडा बुद्रूक, कुकाणा व तरवडी या ग्रामपंचायतीच्या निवडणूक होऊन सरपंच बदलल्याने पाणी व्यवस्थापन समितीत बदलली आहे.
पाणी व्यवस्थापन समितीचे नवीन सदस्य असे : लताबाई अभंग, सुनील खरात, जालिंदर तुपे, भाऊसाहेब सावंत, बाबासाहेब घुले, आर. टी. भिसे, बी. एस. महाजन, एस. एल. गोरे, पी. एस. भगत, एस. एन. थिटे.