विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथे पिंपळगाव पिसा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने शुक्रवारी लसीकरण मोहीम राबविण्यात आली. यावेळी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. स्थानिक व परिसरातील नागरिकांमध्ये लसीकरणासाठी वाद होऊन गोंधळ उडाला. त्यानंतर पोलीस बंदोबस्तात लसीकरण करण्यात आले. यावेळी १७० ग्रामस्थांना लस मिळाली.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर व पिंपळगाव पिसा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ. जयदेवी राजेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाने ३० एप्रिलपूर्वी लसीचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांचे लसीकरण करण्याचे नियोजन केले होते. यावेळी प्रथम विसापूर येथील नागरिकांचे प्राधान्याने लसीकरण करावे, असा आग्रह स्थानिकांनी धरला. त्यामुळे पहिल्या डोसच्या प्राधान्यक्रमाने प्रथम स्थानिक नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. त्यानंतर परिसरातील नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. लसीचे डोस मर्यादित असल्याने लसीकरणासाठी गर्दी पाहता गोंधळ उडाला.
यावेळी बेलवंडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संपतराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार बजरंग गवळी यांनी लसीकरण केंद्रावर उपस्थित राहून नियोजनात सहकार्य केले. यावेळी १४० नागरिकांना दुसरा डोस तर गरोदर माता, अपंग व शासकीय परीक्षार्थी या ३० जणांना असे १७० लोकांचे लसीकरण करण्यात आले.
आरोग्य अधिकारी डॉ. जयदेवी राजेकर, विसापूर उपकेंद्राचे डॉ. विजय शिंदे, आरोग्य पर्यवेक्षक दीपक गोधडे, परिचारिका सुशीला जाधव व कविता गायकवाड यांनी लसीकरण केले. त्यांना विसापूरचे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष शशिकांत गटणे, ग्रामपंचायतीचे सेवक शशिकांत म्हस्के, आशासेविका शोभा पारवे, अनिता शिंदे, मदतनीस सुरेखा पवार यांनी साहाय्य केले.