शेवगाव : कोरोनाने पुन्हा एकदा थैमान घालण्यास सुरुवात केली असून, गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी दैनंदिन जीवनातील सॅनिटायझर वापर घटला असून, सॅनिटायझर व मास्कच्या विक्रीत मोठी घट झाली आहे, तर खबरदारी म्हणून प्रशासनाने शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे मंगळवारी (दि. १६) कोविड सेंटर सुरू केले आहे.
गत दोन दिवसांत अनुक्रमे ३३, ४१ रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. वसतिगृहातील निवासी विद्यार्थ्यांना त्रिमूर्ती कॉलेज येथे स्थलांतरित करण्यात आल्याचे तहसीलदार अर्चना पागिरे यांनी सांगितले. प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोना प्रादुर्भावाच्या सुरुवातीच्या काळात मार्च-एप्रिलमध्ये कोरोना बचावासाठी नागरिक स्वतः होऊन काळजी घेताना दिसत होते. त्यात मास्क, सॅनिटायझरचा वापर केला जात होता. परिणामी कोरोना आजारापासून तब्बल अडीच महिने अबाधित राहिलेल्या शेवगाव तालुक्यात २९ मे २०२० रोजी पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर तालुक्यातील रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होऊन रुग्णांची संख्या हजारोच्या पार गेली होती.
त्यानंतर कोरोनाची संख्या घटत गेली तशी नागरिकांच्या मनातील कोरोनाची भीती निघून गेली होती. दरम्यान, नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून वापरल्या जाणाऱ्या मास्क, सॅनिटायझरचा वापर करणे टाळले. पुन्हा कोरोनाने डोके वर काढले असून, प्रशासनाकडून मास्कचा सार्वजनिक ठिकाणी वापर सक्तीचा केला आहे. विना मास्क सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. दरम्यान, मास्क व सॅनिटायझरचा वापर घटल्याने नागरिक कोरोनाला आमंत्रण देत आहेत.
...........
कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात सॅनिटायझर, मास्कची विक्री मोठ्या प्रमाणात होत होती. नागरिकही जिवाच्या काळजीपोटी सॅनिटायझर, मास्क खरेदी करीत होते. सध्या ७० ते ८० टक्क्यांनी मास्क, सॅनिटायझर विक्री घटलेली आहे.
- संजय भापकर, औषध विक्रेता.
---------
गत दोन दिवसांत मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून आलेत. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, तसेच कोरोना काळात शासनाने ठरवून दिलेले नियम पाळावे. तसेच वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. कोरोना हद्दपार करण्यासाठी नागरिकांनी सूचनांचे पालन करावे.
- अर्चना पागिरे, तहसीलदार.