राहुरीचे प्राजक्त तनपुरे यांना आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये मंत्रिपदाची संधी मिळाली. राष्ट्रवादीकडून आमदार डॉ. किरण लहामटे, निलेश लंके, आशुतोष काळे यांची नावे मंत्रिपदासाठी चर्चेत होती. राष्ट्रवादी काँग्रेस सामान्य चेहऱ्याला संधी देईल अशी चर्चा होती. मात्र, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाचे असलेले साखरसम्राट तनपुरे यांच्या गळ्यात राष्ट्रवादीने मंत्रिपदाची माळ टाकत प्रस्थापित घराण्याला व नात्यागोत्यालाच पक्षाने संधी दिली.
तनपुरे हे त्यांचा राहुरी मतदारसंघ वगळता इतर तालुक्यात फारसे दौरे करताना दिसत नाहीत. ते थेट प्रदेशाध्यक्षांचे नातेवाईक असल्याने कार्यकर्त्यांना तक्रारही करण्यास मर्यादा आहेत. त्यांच्या आजोबांच्या नावाने असलेला राहुरीतील सहकारी कारखाना अडचणीत आहे. या कारखान्याच्या कामगारांनी पगार मिळत नसल्याने नुकतेच उपोषण केले. तनपुरे यांचा खासगी कारखाना सुरळीत सुरू असताना सहकारी कारखाना मात्र अडचणीत आहे. सहकारी कारखान्याबाबत खासदार सुजय विखे व माजी आमदार शिवाजी कर्डिले हे सक्रिय असून राष्ट्रवादी त्यात फारसा रस दाखविताना दिसत नाही.
पालकमंत्री हसन मुश्रीफ हे कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. ते पंधरवड्यातून अथवा महिन्यातून एक दिवसाचा जिल्हा दौरा करतात. मुश्रीफ वेळ देत नसल्याने तनपुरे यांनी ती उणीव भरून काढावी. ते तरुण असल्याने त्यांनी पक्ष संघटनेसाठी अधिक वेळ द्यावा अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. मात्र, अद्याप तसे घडताना दिसत नाही.
अपक्ष निवडून आल्यानंतर गडाख यांना शिवसेनेच्या कोट्यातून मंत्रिपद मिळाले. त्यानंतर त्यांनी हातावर शिवबंधन बांधले. गडाख यांनी शिवसेनेला बळकटी देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. मतदारसंघ व इतर तालुके असा दोन्हींकडे त्यांनी संपर्क ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. ‘आपणाला कधीही फोन करा’ असे आवाहनच त्यांनी गत आठवड्यात शिवसैनिकांना केले आहे. त्यांनी संपर्क अभियानही सुरू केले आहे. सेनेत पुन्हा आपण चैतन्य आणणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
................
राष्ट्रवादीकडून नगर महापालिका वाऱ्यावर
तनपुरे हे नगर विकास राज्यमंत्री असल्याने नगर महापालिकेचा कायापालट होईल अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांनी नगर महापालिकेसाठी अद्याप विशेष योजना जाहीर केलेली नाही. याऊलट महापालिकेतील अधिकारी कल्याण बल्लाळ यांच्या नियुक्तीबाबत नगरविकास विभागाने काढलेल्या आदेशाला नागरिकांनी हरकत घेतली आहे. बल्लाळ यांची नियुक्ती वादात असताना मंत्रालय ठोस भूमिका घेत नसल्याची तक्रार आहे. महापालिकेतील भ्रष्टाचाराबाबत नगरविकास खात्याकडे अनेक तक्रारी गेलेल्या आहेत. मात्र, त्यावर ठोस कार्यवाही होताना दिसत नाही.
.............
काँग्रेसचे जिल्ह्याध्यक्ष वेळ देईनात
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, तसेच शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सक्रिय दिसतात. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे मंत्र्यांपेक्षा फाळके यांच्या अधिक संपर्कात आहेत. मात्र, फाळके यांनाही पक्षाकडून व मंत्र्यांकडून ताकद मिळताना दिसत नाही. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे हे मात्र पक्ष बांधणीसाठी वेळ देताना दिसत नाहीत. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे हे सक्रिय आहेत. मात्र, त्यांचाही अधिक भर हा आमदार संग्राम जगताप यांच्यावर टीका करण्यावर आहे.