पिंपळगाव माळवी : मागील दीड वर्षापासून शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही कोरोना महामारीमुळे संपूर्ण जनजीवन ठप्प झाले आहे, परंतु अशा आणीबाणीच्या परिस्थितीत ग्रामीण भागातील पोस्ट कार्यालयाची अविरत सेवा सुरू असल्याने, सामान्य जनतेला आधार मिळत आहे.
नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथे ग्रामीण पोस्ट कार्यालय असून, येथे दोन कर्मचारी अविरत सेवा देत आहेत. सामान्यांची टपाल, पार्सल व त्याचबरोबर, पोस्टाने येणारे एटीएम, चेक बुक, महत्त्वाची कागदपत्रे वेळेवर पोहोच करून सामान्यांना आधार देत आहेत. सध्या कोरोनामुळे बरेचसे आर्थिक व्यवहार ऑनलाइनच होत असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना एटीएम व चेक बुकचा मोठा आधार ठरत आहे. पिंपळगाव माळवी येथे जेऊर येथून टपाल थैली येते. येथे आल्यानंतर सर्व टपाल व कागदपत्रे सॅनिटाइझ करूनच ग्रामस्थांना वाटप केले जाते. त्यामुळे कर्मचाऱ्यांबरोबरच ग्रामस्थांचाही करोनाचा धोका टाळला जातो. टपाल वाटपाबरोबरच येथे इंडियन पोस्ट पेमेंट बँकेसह येथे एक हजार ग्रामस्थांचे खाते आहेत. त्यांना दैनंदिन गरजेसाठी वेळेवर पैसा उपलब्ध होत आहे.
---
मागील दीड वर्षापासून आम्ही अविरत सेवा देत असून दररोज अनेकांशी संपर्क येतो परंतु आम्ही करोनाचे सर्व नियम पाळतो. आणीबाणीच्या काळात आमच्याकडून लोकांची सेवा होतेय याचा खूप आनंद वाटतो.
-रमेश गायकवाड,
पोस्ट मास्तर, पिंपळगाव माळवी
----
मी दररोज जेऊर येथून पिंपळगावला टपाल थैली घेऊन येतो व गावात टपाल वाटप करतो. ग्रामस्थांचे चेक बुक, एटीएम, कागदपत्रे वेळेवर मिळाल्यामुळे त्यांना खूप आनंद होतो.
-रशीद सय्यद,
पोस्टमन, पिंपळगाव माळवी
020621\0_img_20210601_134207.jpg
लॉक डाऊनमध्ये ग्रामीण पोस्ट ऑफिस देत आहे अविरत सेवा