पारनेर : तालुक्यातील पिंपळनेर येथील १६ वर्षीय चुलत बहिणींनी विषारी द्रव प्राशन केल्याप्रकरणी पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली आहे. यात एका मुलीचा मृत्यू झाला असून दुसरी मुलगी बेशुद्ध आहे. छेडछाडीमुळेच त्या दोघींनी विषारी द्रव प्राशन केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
पिंपळनेर येथील १६ वर्षीय दोन चुलत बहिणींनी गुरुवारी दुपारी एक ते दोनच्या सुमारास विषारी द्रव घेतले. दोघींना अत्यवस्थ वाटू लागल्यानंतर त्यांना शिरूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यातील एकीचा मृत्यू झाला तर दुसरी मुलगी अत्यवस्थ अवस्थेत आहे. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
पिंपळनेर येथील सिद्धेश पोपट रासकर (वय १९) व विवेक नाना काळोखे (वय १९) हे सातत्याने दोघींची छेडछाड करीत होते. त्यातून या दोघींनी विषारी द्रव्य घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी रात्री सिद्धेश रासकर व विवेक काळोखे यांना अटक केली. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बालाजी पडमने तपास करीत आहेत. एक मुलगी अद्यापही शुद्धीवर आली नसल्याने पोलिसांना कोणताही जबाब घेता आला नाही. तिच्या जबाबानंतर यातील घटनाक्रम उलगडणार आहे.