अहमदपूर (जि. लातूर) : शेतात भुईमूग काढत असताना अचानक विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू होताच वीज पडून दोन जणांचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाल्याची घटना अहमदपूर तालुक्यातील गोताळा शिवारात घडली. जखमींवर अहमदपूरच्या ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून लातूरला हलविण्यात आले आहे.
गोताळा येथे भुईमूग काढणी सुरू होती. सायंकाळच्या सुमारास भुईमूग काढत असलेल्या मजुरांवर अचानक वीज पडली. यात विक्रम सोपान कारले (वय ५५), रंजनाबाई बळी संमुखराव (वय ५५) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तसेच महेश विक्रम कारले, अर्पिता भास्कर कांबळे, कविता महेश कारले, महानंदा सुकाचार्य सूर्यवंशी, बालिका धनराज कांबळे, आरती केशव जाधव हे जखमी झाले आहेत. जखमींवर अहमदपूर येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून लातूर येथील शासकीय सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली.
दोघांची प्रकृती गंभीर
वीज पडून जखमी झालेल्या सहापैकी महेश विक्रम कारले व अर्पिता भास्कर कांबळे या दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉ. नागरगोजे यांनी सांगितले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी रुग्णालयात जाऊन पाहणी केली. तसेच प्रशासनाला सूचना करून जखमींना तातडीने उपचार करण्यास सांगितले.