संगमनेर : भरधाव वेगाने जाणाऱ्या दोन जीपची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात पोलीस निरीक्षकासह दोन जण जागीच ठार, तर ४ जण गंभीर जखमी झाले. सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास तालुक्यातील नाशिक-पुणे महामार्गावरील डोळासणे शिवारात हा अपघात झाला. मृतांमध्ये नाशिक येथे वाहतूक शाखेत कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक संजय रामकृष्ण विसपुते (वय ५४) यांचा समावेश आहे. विसपुते हे इनोव्हा कार (क्र. एम.एच.१५ सी.टी.६५४३) या वाहनातून पुण्याहून नाशिककडे येत होते. डोळासणे शिवारात सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास सदर वाहन व समोरुन येणारी बोलेरो जीपची (क्र. एम.एच.१६ ए.जे.६१४६)) समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. अपघाताची माहिती समजताच परिसरातील नागरिक व इतर वाहन चालक घटनास्थळी पोहचले. घारगावचे पोलीस त्वरित घटनास्थळी पोहोचले. या अपघातात पोलीस निरीक्षक विसपुते यांना गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.बोलेरो जीपमधील शाबिरा पीरमहमंद शेख (वय ५०) या महिलेलाही गंभीर मार लागल्याने तिचाही मृत्यू झाला. या वाहनातील शाकीरा शेख (वय ४०), मुश्ताक सय्यद (वय २७), युसूफ अली सय्यद (वय ५५)),मोहंम्मद पीरमहंमद सय्यद (वय ६०, सर्व. रा. घारगाव) हे गंभीर जखमी झाले. यावेळी रामनाथ कसबे, सुरेश गाडेकर, आत्तार सय्यद, दीपक भांगरे, भास्कर पिचड यांनी सहकार्य करुन सर्व जखमींना तातडीने संगमनेरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत अपघाताचा गुन्हा घारगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला नव्हता. (तालुका प्रतिनिधी)
दोन जीपच्या धडकेत पोलीस निरीक्षकासह दोन ठार
By admin | Updated: September 20, 2016 00:13 IST