अहमदनगर : मुद्रांक शुल्कात १ सप्टेंबरपासून ५० टक्के सवलत दिली जात आहे. त्याची मुदत ३१ डिसेंबरला संपत आहे. ५० टक्के सवलत म्हणजे, ६ टक्क्यांऐवजी ३ टक्केच शुल्क आकारले जात होते. आता एक जानेवारीपासून तीनऐवजी चार टक्के मुद्रांक शुल्क आकारण्यात येणार आहे. ही दोन टक्क्यांची सवलत ३१ मार्चपर्यंत असणार आहे.
राज्य शासनाने १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत मुद्रांक शुल्कात तीन टक्के सवलत दिली होती. पूर्वी ती ६ टक्के होती. पन्नास टक्के सवलतीमुळे घर खरेदी-विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर वाढले. ३१ डिसेंबरपर्यंत पन्नास टक्के सवलतीचा लाभ घेण्यासाठी अनेकांनी घर खरेदी आधीच केली. सध्याही दुय्यम निबंधक कार्यालयात मोठी गर्दी असते. ३१ डिसेंबरला गर्दी उसळणार नाही, यासाठी मागणीप्रमाणे शनिवारी पारनेर येथील एक व नगर शहरातील एक दुय्यम निबंधक कार्यालय सुरू राहणार आहे. यादिवशी दस्त नोंदणी, खरेदी-विक्री व्यवहार पूर्ण करता येणार आहेत, अशी माहिती मुद्रांक जिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांनी दिली. नाताळ आणि रविवारची मात्र सुटी राहणार आहे. पारनेर तालुक्यातही मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्रीचे व्यवहार होत असल्याने तेथील कार्यालय शनिवारी सुरू राहणार आहे.
-------------
३१ डिसेंबर ही ३ टक्के सवलतीची अंतिम मुदत असली तरी नागरिकांनी ३१ डिसेंबर किंवा त्यापूर्वी मुद्रांक शुल्क भरले आणि त्यांनी ३१ डिसेंबरनंतर जरी दस्तनोंदणी केली तरी त्यांना ३ टक्के सवलत लागू राहणार आहे. त्यामुळे दस्तनोंदणीसाठी नागरिकांनी घाई करू नये किंवा गर्दी करू नये. मुद्रांक शुल्कात ३ टक्के सवलतीची मुदत ३१ डिसेंबरला संपत असून १ जानेवारी ते ३१ मार्च या कालावधीसाठी मुद्रांक शुल्कात २ टक्के सवलत राहणार आहे. म्हणजे, सहा टक्क्यांऐवजी चार टक्के मुद्रांक शुल्क आकारले जाणार आहे.
-राजेंद्र पाटील, मुद्रांक जिल्हाधिकारी, अहमदनगर
---------------
अशी आहे सवलत (नगरपालिका, महापालिका, प्रभाव क्षेत्र)
कालावधी एकूण मुद्रांक शुल्क आकारणी सवलत
१ सप्टेंबरपूर्वी (२०२०) ६ टक्के ०
१सप्टेंबर ते ३१ डिसेंबर -२०२० ३ टक्के ३ टक्के
१ जानेवारी ते ३१ मार्च २०२१ ४ टक्के २ टक्के