अहमदनगर : अहमदनगर मर्चंटस् को-आॅप. बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सत्ताधारी पॅनलचे दोन उमेदवार बिनविरोध झाले. सोमवारी एका उमेदवाराने माघार घेतली आहे, तर अन्य एका जागेसाठी एकमेव अर्ज होता. त्यामुळे आता १५ जागांसाठी २३ उमेदवार रिंगणात आहेत.बँकेच्या १७ जागांसाठी २७ जणांचे अर्ज वैध झाले होते. सोमवारी अर्ज माघारी घेण्याचा अखेरचा दिवस होता. इतर मागास प्रवर्गातील शिवराम उत्तम भगत यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे विद्यमान संचालक विजय कोथंबिरे यांची निवड बिनविरोध झाली. अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातील एका जागेसाठी विद्यमान संचालक सुभाष बायड यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यांचीही निवड बिनविरोध घोषित करण्यात आली. या दोन्हीही जागा सत्ताधारी गटाच्या आहेत. निवडणूक चिन्हांचे वाटप मंगळवारी होणार आहे, असे जिल्हा उपनिबंधक दिगंबर हौसारे यांनी सांगितले. सर्वसाधारण गटातील १२ जागांसाठी १८ उमदेवारांनी अर्ज कायम ठेवल्याने निवडणुकीतील रंगत वाढणार आहे. याशिवाय अन्य दोन जागांमध्ये सरळ लढत असली तरी विद्यमान संचालकांचेच पारडे जड मानले जात आहे.(प्रतिनिधी)
सत्ताधारी पॅनलचे दोन उमेदवार बिनविरोध
By admin | Updated: September 22, 2015 00:23 IST