गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील मंदिरांच्या दानपेट्या फोडीच्या घटना वाढल्या आहेत. अकोले पोलिसांनी या चोऱ्यांचा छडा लावत दोन आरोपींना अटक केली आहे. प्रभारी पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांनी पथक तयार केले आहे. हे पथक रात्री गस्त घालत असताना ३ इसम हे संशयितरित्या महालक्ष्मी मंदिराच्या गेटजवळ दिसले. पथकाने नागरिकांच्या मदतीने मच्छिंद्र पांडुरंग मेंगाळ, राजू ठमा मेंगाळ (दोघे रा. उंचखडक खुर्द) यांना पकडले. तर त्यांचा तिसरा साथीदार विलास लक्ष्मण गावंडे (रा. उंचखडक खुर्द) हा फरार झाला आहे. त्यांच्याकडून चोरीत वापरलेले साहित्य, कटावणी, ग्रॅण्डर, रोख रक्कम व दोन मोटारसायकल जप्त केल्या. महालक्ष्मी माता मंदिर (अकोले), दत्त मंदिर (रुंभोडी), अंबिका माता मंदिर (गणोरे) व अंबाबाई मंदिर (टाहाकरी) या मंदिरामध्ये चोरी केल्याची आरोपींनी कबुली दिली. प्रभारी पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, तसेच भुषण हांडोरे, अजित घुले, विठ्ठल शेरमाळे, गोविंद मोरे, रवींद्र वलवे, गणेश शिंदे, प्रदीप बढे, आत्माराम पवार, संदीप भोसले यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
दानपेटी फोडून चोरी करणारे दोघे जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:22 IST