अहमदनगर : कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. मृतांची संख्याही वाढत आहे. नगर येथील अमरधाम स्मशानभूमीत रोज ३० ते ४० जणांवर अंत्यसंस्कार होतात. मयतांवर अंत्यसंस्कार करणारे स्वयंसेवक स्वत:च्या जीवाची पर्वा न करता लढत आहेत. अशा अमरधाममधील बारा जणांपुढे नतमस्तक होत जागरुक नागरिक मंचाने त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. याचवेळी अमरधाममधील बाराही जणांचा पाच लाख रुपयांपर्यंतचा विमा उतरविण्यासाठी दीनदयाळ परिवाराचे प्रमुख वसंत लोढा आणि जागरुक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहास मुळे यांनी पुढाकार घेत अमरधाममधील कर्मचाऱ्यांच्या सेवाकार्याला बळ दिले.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असताना नगर जिल्ह्यात एकीकडे हॉस्पिटलमध्ये बेडपासून ऑक्सिजनपर्यंत धावाधाव सुरू आहे, तर दुसरीकडे लस आणि औषधांवरून राजकारण सुरू आहे. अशा परिस्थितीत काही हात आपले काम चोखपणे, विनातक्रार बजावत आहेत. ते म्हणजे स्मशानभूमीत मृतांवर अंत्यसंस्कार करणारे स्वयंसेवक. नगरमध्ये अशाच स्वयंसेवकांप्रती बुधवारी रात्री कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. जागरुक नागरिक मंचाच्या सदस्यांनी नगरकरांतर्फे थेट अमरधाममध्ये जाऊन या स्वयंसेवकांना हात जोडून वंदन करण्यात आले.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यूंचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे स्मशानभूमीही धगधगत आहे. तेथे राबणारे कर्मचारी आणि स्वयंसेवक अविरत काम करीत आहेत. कित्येक दिवस ते घरीही गेले नाहीत. कोरोनाचे नियम पाळून अंत्यविधी करताना माणुसकीचा ओलावाही त्यांना टिकवावा लागत आहे. कधी मृतासोबत नातेवाईक येतात, तर कधी कोणीच नसते. परिस्थिती कशीही असली तरी स्वत:चा जीव धोक्यात घालून हे स्वयंसेवक राबत आहेत. कोरोना योद्धा म्हणून काही घटकांचा सन्मान होत असला तरी अंत्यसंस्कारांची जबाबदारी पार पाडणारा हा घटक उपेक्षितच आहे. अशा उपेक्षितांकडे जागरुक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहास मुळे यांनी लक्ष वेधले. अमरधाम येथे जाऊन तेथे अंत्यसंस्काराचे काम करणारे स्वप्नील कुऱ्हे व त्यांच्या ११ सहकाऱ्यांचा पुष्पगुच्छ आणि श्रमपरिहार म्हणून लस्सीची पाकिटे देण्यात आली. यावेळी दीनदयाळ परिवाराचे प्रमुख वसंत लोढा, कैलास दळवी, मकरंद घोडके, राजेंद्र पडोळे, योगेश गणगले, राजेश सटाणकर, देविप्रसाद अय्यंगार, प्रसाद कुकडे, अमेय मुळे, विशाल गायकवाड आदी नागरिक उपस्थित होते.
---
कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्कार करणारे अमरधाममधील बारा कर्मचारी जीवाची पर्वा न करता काम करीत आहेत. त्यांनाही कुटुंब आहे, संसार आहे. त्यांचा पाच लाखांपर्यंतचा विमा उतरविण्याबाबत निर्णय घेतला. विम्याच्या प्रीमिअमची रक्कम दीनदयाळ परिवार भरणार आहे. त्यासाठी सर्व प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
-वसंत लोढा, दीनदयाळ परिवार
----------
फोटो- २९ अमरधाम
अहमदनगर येथील अमरधाम स्मशानभूमीत कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रती जागरुक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहास मुळे, दीनदयाळ परिवाराचे प्रमुख वसंत लोढा हे नतमस्तक झाले.