संगमनेर : महाराष्ट्राइतकी सक्षम सहकार चळवळ इतर कुठल्याही राज्यात नाही. सर्वाधिक काम सहकार क्षेत्रात झाले. मात्र, आज सहकार मोडायचा धंदा सुरू आहे. ज्यांनी भ्रष्टाचार केला असेल, त्यांच्यावर जरूर कारवाई करा. पण, सहकार मोडू नका, असे रोखठोक प्रतिपादन माजी वनमंत्री आ. डॉ. पतंगराव कदम यांनी केले. संगमनेर येथे मंगळवारी जाणता राजा मैदानावर स्व. अण्णासाहेब शिंदे व भाऊसाहेब थोरात जयंती महोत्सवाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आ. उल्हास पवार होते. व्यासपीठावर गुलाबराव शेळके, डॉ. हमीद दाभोलकर, अॅड. मुक्ता दाभोलकर, माजी आ. भानुदास मुरकुटे, जयंत ससाणे, पंडित थोरात, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, कांचन थोरात, बाजीराव खेमनर, अॅड. माधव कानवडे, अरुण कडू, रणजीत देशमुख आदी उपस्थित होते. कदम पुढे म्हणाले, सहकार चळवळीमुळे राज्यात मोठे काम झाले. चळवळीत काही ध्येयवादी तर काही मोडणारे आहेत. स्व. भाऊसाहेब थोरात हे सहकार चळवळीचा आदर्श आहेत. शिंदे, थोरात यांनी मोठे काम या क्षेत्रात केले. सामान्यांना ताकद देणारी ही चळवळ आहे. अडचणीत आलेले साखर कारखाने खासगीत विकू नका तर ते सहकाराकडे द्या, असे धोरण मी सहकारमंत्री असताना घेतले होते. पण, या सरकारने त्या उलट केले. भारती विद्यापीठ बोळीत काढल्याची चर्चा व्हायची. आपण वादळातून दिवा लावला, असे त्यांनी सांगितले. मुक्ता दाभोलकर यांनी स्व. थोरात व दाभोलकर यांचे काम एकमेकांशी पूरक होते. जादूटोणा कायदा ही शासनाची देणगी असून २०० केसेस दाखल झाल्या आहेत. जातपंचायत मोडण्याचे मोठे काम नगर जिल्ह्यात झाले. अंनिसचे काम वाढविणे हेच दाभोलकर यांच्या खूनाला उत्तर असल्याचे सांगितले. हमीद दाभोलकर यांनी २९ महिने उलटूनही स्व. दाभोलकर यांच्या खुनाचा तपास लागत नाही. कॉ. गोविंद पानसरे व कलबुर्गी यांच्या हत्या होवूनही ‘मॉर्र्निंग वॉक’ ला येण्याचे आव्हान दिले जाते, असे म्हणत नाराजी व्यक्त केली. देश अवघड कालखंडातून जात आहे. प्रश्न विचारणाऱ्यांना गोळ्या घातल्या जात आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम कुठल्याही देव-धर्माविरुद्ध नाही. तर त्याआडून होणाऱ्या शोषणाविरुद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी कदम, दाभोलकर व शेळके यांना पुरस्कार देवून गौरविण्यात आले. प्रास्ताविक आ. डॉ. सुधीर तांबे यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ व प्रकाश बर्डे यांनी करून आभार मानले. (प्रतिनिधी) पुरस्काराची रक्कम अंनिसला माजी मंत्री आ.पतंगराव कदम यांनी पुरस्काराची एक लाखाची रक्कम अंधश्रद्धा निर्मूलन समिती तर गुलाबराव शेळके यांनी अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेला दिली.
महाराष्ट्रातील सहकार मोडण्याचा प्रयत्न
By admin | Updated: January 12, 2016 23:36 IST