बनावट डिझेलप्रकरणात ट्रकमालकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2020 14:46 IST
बनावट डिझेल प्रकरणात पोलिसांनी शनिवारी जामखेड येथील एका ट्रकमालकास अटक केली असून न्यायालयाने त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. या ट्रकमालकाकडून पोलिसांना डिझेल रॅकेटबाबत काय माहिती मिळते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
बनावट डिझेलप्रकरणात ट्रकमालकास अटक
अहमदनगर: बनावट डिझेल प्रकरणात पोलिसांनी शनिवारी जामखेड येथील एका ट्रकमालकास अटक केली असून न्यायालयाने त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. या ट्रकमालकाकडून पोलिसांना डिझेल रॅकेटबाबत काय माहिती मिळते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.गोकूळदास ईश्वरचंद्र सूर्यवंशी असे अटक केलेल्या ट्रकमालकाचे नाव आहे. नगर शहरात तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.दत्ताराम राठोड यांच्या पथकाने २६ ऑक्टोबर रोजी छापा टाकून १ हजार ९३७ लिटर बनावट डिझेल जप्त केले होते. या कारवाईला सहा दिवस उलटले तरी या डिझेल रॅकेटचा मुख्य सूत्रधार कोण आणी नगरमध्ये हे डिझेल कोठून आले होते हे अद्यापपर्यंत समोर आलेले नाही. बनावट डिझेलची विक्री करणारा गौतम वसंत बेळगे याला पोलिसांनी घटनेच्या दिवशीच अटक केली आहे. या प्रकरणात बेळगे याचे आणखी किती साथीदार सक्रिय आहेत हे समोर येणे अजून बाकी आहे.या गुन्ह्याचे तपासी अधिकारी पोलीस उपाधीक्षक विशाल ढुमे यांनी शुक्रवारी घटनास्थळी जाऊन पंचनाम करत तपासणीसाठी नमुने ताब्यात घेतले. हे नमुने रासायनिक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. प्रयोगशाळेतील अहवालानंतर हे डिझेल नेमके कोणते आहे व त्याच्यात कशाची भेसळ केली जाते हे समोर येणार आहे.ट्रक हेराफेरीतही समोर येणार खूप काहीट्रकची चोरी झाल्याचे दाखवून इन्शुरन्सचे पैसे लाटणारी टोळी नगरमध्ये सक्रिय असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणाचा तपास उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून सुरू आहे. याप्रकरणाचा खोलवर तपास झाला तर यामध्येही अनेक जणांची नावे समाेर येण्याची शक्यता आहे.