अहमदनगर : स्टेशन रोड आणि शहरातील वाहतुकीचे अक्षरश: बारा वाजले आहेत. वाहतुकीच्या नियमांची पुरती वाट लागली असून वाहनचालकांच्या बेशिस्तीमुळे नागरिकांचा जीव कोंडला आहे. रस्त्यावर विक्रेत्यांनी केलेली अतिक्रमणे, लग्नसराईमुळे झालेली गर्दी, रस्त्यातच वाहने उभी करून केली जाणारी खरेदी, गावातील रस्त्यांमध्ये दोन्ही बाजूंनी लावलेली वाहने यामुळे वाहतुकीचे बारा वाजले आहेत. दिल्लीगेट, चौपाटी कारंजा,चितळे रोड, रेल्वे स्टेशन रोड, कापड बाजार, अमरधाम आदी भागात वाहतूक ठप्प झाल्याने वाहनचालकांचाही श्वास कोंडला आहे. वाहतूक पोलिसांनीही वाहतुकीपुढे हात टेकले आहेत. दिल्लीगेट, चितळे रोड, कापड बाजारात फळ विक्रेत्यांनी रस्ते काबीज केले आहेत. फळ विक्रेत्यांच्या गाड्यांमुळे दोन्ही बाजूंनी रस्ते अडले आहेत. आंबे विक्रेत्यांचीही गर्दी रस्त्यावर झाली आहे. त्यामुळे रस्त्यातून वाट काढणे कठीण झाले आहे. अतिक्रमणे काढण्यासाठी महापालिकेने कारवाई न केल्याने रस्ते अरुंद बनले आहेत. त्यातच चारचाकी वाहनांना दिल्लीगेटच्या आतमध्ये प्रवेश नसतानाही सर्रासपणे वाहने आतील रस्त्यांवरून जात आहेत. तसेच रस्त्यातच चारचाकी वाहने उभी केली जात आहेत. त्यामुळे आधीच अंरुद रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत आहे. रस्त्यामधून मार्ग काढण्यासाठी कर्णकर्कश हॉर्न वाजविले जात असल्याने ध्वनी प्रदूषणामध्येही भर पडली आहे. भाजी विक्रेतेही रस्त्यावर बसलेले आहेत. चारचाकी वाहने थांबवून रस्त्यातच भाजी, आंबे, फळ खरेदी केले जात आहेत. अशा वाहनांवर कारवाई करण्यासाठी शहरातील रस्त्यांवर एकही वाहतूक पोलीस हजर नसल्याने वाहतुकीची कोंडी कोणी सोडवायची असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यामुळे कोंडीतून मार्ग काढताना वाहनचालकांमध्येच वाद, हाणामारी, शिवीगाळ होण्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. (प्रतिनिधी)रेल्वे स्टेशनवर दुपारी चारच्या सुमारास वाहतुकीची कोंडी झाली होती. वाहने रस्त्यातच उभी राहिल्याने वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी शेवगाव-नगर ही एस.टी. बस रस्त्यात उभी होती. या बसच्या मागे कार होती. एस.टी. पुढे का जात नाही? या कारणावरून कारमधील चौघांनी एस.टी.चे बसचालक बबन भाऊसाहेब आहेर यांच्यासोबत वाद घातला. त्यानंतर त्या अनोळखी व्यक्तींनी चालक आहेर यांना बेदम मारहाण केली. आहेर यांना एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान एस.टी.च्या कर्मचार्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात या घटनेबाबत तक्रार दिली आहे.महापालिकेमार्फत फेरीवाला धोरणांची पार वाट लागली आहे. रस्त्यावर बसणार्या फेरीवाल्यांवर महापालिका प्रशासनाकडून कोणतीही कारवाई कारवाई केली जात नाही. त्यामुळे गावातील सर्व रस्ते अडले आहेत. अतिक्रमण हटविण्याबाबतही महापालिका प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने रस्ते अरुंद बनले आहेत. सध्या उन्हाळा सुरू असल्याने रस्ते अडविणार्या आंबे, टरबूज विक्रेत्यांची संख्या वाढली आहे. अन्य फळांच्या गाड्याही रस्त्यावर मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे रस्त्यावरून वाहने जाण्यासाठी जागा मिळणे कठीण झाले आहे. मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या तीन दिवशी शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होते. ही कोंडी फोडण्यासाठी शहर वाहतूक शाखेचे पोलीस ठिकठिकाणी नियुक्त करण्यात आले आहेत. मात्र वाहनचालक, मनपा प्रशासन यांचे कोणतेही सहकार्य मिळत नसल्याने वाहतुकीचा प्रश्न जटील बनला आहे. गुरुवारी (दि.२२) लग्नतिथी होती. शिवाय पर्यटनासाठी बाहेरून येणार्या वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी जटील झाली आहे. पोलीस ही कोंडी कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. - सचिन सानप, सहायक पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा
वाहतुकीचे वाजले बारा....
By admin | Updated: May 23, 2014 01:29 IST