केडगाव : नगर तालुक्यात कोरोनाची भयावह परिस्थिती निर्माण होत असून, जिल्ह्यात मनपानंतर तालुक्यात कोरोनाबाधितांचा क्रमांक आहे. कोरोनाबाधितांची संख्या सात हजाराच्या घरात जाऊनही तालुक्यात तीन आमदार असताना एकानेही तालुक्यात कोरोनासंदर्भात आढावा बैठक घेऊन सर्वसामान्य रुग्णांना दिलासा देण्याचे काम केलेले नाही. प्रशासनाच्या एकखांबी तंबूखाली तालुक्याचा कोरोना आता वाऱ्यावर आहे.
नगर तालुक्यात सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ८५६ आहे. तहसीलदार उमेश पाटील, निवासी तहसीलदार अभिजित बारवरकर, आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती मांडगे यांनी प्रयत्न करून पाच ठिकाणी कोविड सेंटर सुरू करून ४५० बेडची व्यवस्था केली. मात्र, ही व्यवस्था आता अपुरी पडल्याने अनेकांना खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागला आहे.
शासकीय आकडेवारीनुसार आजमितीला नगर तालुक्यात आजवर ७ हजार कोरोना रुग्ण आढळून आले असून, सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ८५६ इतकी आहे. १२२ कोरोना रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शासकीय संख्येपेक्षा किती तरी अधिक रुग्णसंख्या प्रत्यक्षात तालुक्यात आहे. प्रशासनाने चिचोंडी पाटील, अरणगाव, जेऊर, बुऱ्हाणनगर, निंबळक, या ठिकाणी कोविड सेंटर सुरू केले आहेत. ४५० पर्यंत रुग्ण होतील येथपर्यंत त्यांची क्षमता वाढविण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, सक्रिय रुग्णाची संख्या पाहता फक्त प्रशासनावर अवलंबून राहणे तालुक्यासाठी धोकादायक बनले आहे.
आमदार नीलेश लंके यांनी १ हजार बेडचे कोविड सेंटर सुरू केले आहे. आमदार रोहित पवार यांनी ६०० बेडचे कोविड सेंटर सुरू केले आहे. माजी आमदार राहुल जगताप यांचेही कोविड सेंटर सुरू होत आहे, तसेच जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत लोकप्रतिनिधींनी कोविड सेंटर सुरू केले आहे. त्याच धर्तीवर येथील लोकप्रतिनिधींनी लोकहिताचा विचार करता पुढे येत कोविड सेंटर सुरू करावे, अशी मागणी तालुक्यातील जनतेमधून होत आहे.
नगर तालुका तीन विधानसभा मतदारसंघांत विभागला आहे. तालुक्याला तीन आमदार असताना व तालुक्यात कोरोनाची गंभीर परिस्थिती असताना तालुक्यात आढावा बैठक घेऊन तालुक्याचे योग्य नियोजन करायला हवे होते. मात्र, तसे झाले नाही.
--
गुंड, पवार, भापकर आले धावून
पंचायत समिती सभापती सुरेखा गुंड, उपसभापती डॉ. दिलीप पवार, माजी सभापती प्रवीण कोकाटे, माजी उपसभापती रवी भापकर हे तालुक्यातील सर्वसामान्य लोकांसाठी धावून आले. प्रत्येक आरोग्य केंद्राला भेटी देणे, लसीकरण, कोविड सेंटरच्या भौतिक सुविधा पाहणे आदी कामे ही मंडळी करीत आहेत.
--
नगर तालुक्यात कोरोना आढावा बैठक झाली नाही. मात्र, प्रशासकीय पातळीवर रोज बैठका घेऊन आढावा घेतला जातो. पर्यवेक्षकांची चार दिवसांनी बैठक घेऊन अहवाल घेतला जातो. तलाठी पातळीवर आमचे कामकाज सुरू आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन व्हावे यासाठी ठोस भूमिका घेतली आहे.
-अभिजित बारवकर,
नायब तहसीलदार