पारनेर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धी येथील भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन कार्यालयातील दूरध्वनीवर हजारे व राज्यातील मंत्र्यांसाठी धमकीचे दूरध्वनी येत आहे़ निलेश पोतनीस (रा़नारायणपूर, जि़पुणे) बोलत असल्याचे सांगून गेल्या महिन्याभरापासून दूरध्वनीवरुन हे धमकीसत्र सुरु आहे़ मात्र, याबाबत अद्याप पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही़गेल्या महिनाभरापासून अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धी येथील भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाच्या कार्यालयात दूरध्वनीवरुन धमक्या येत आहेत़ दूरध्वनीवरुन बोलणारा निलेश पोतनीस हे नाव सांगून पुणे येथील सारसबाग जवळील माझी जमीन काही जणांनी हडप केली असल्याचे सांगतो व यास पोलीस,अण्णा, शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, आर. आर. पाटील, प्रणिती शिंदे हे लोक जबाबदार असल्याचे सांगत आहे. या सर्वांचे नाव घेऊन तो धमकी देत आहे. तसेच एखादा एकर जमीन विकून पुण्यामध्ये बाँबस्फोट घडवून आणण्याची धमकी दूरध्वनीवरुन येत असल्याचे अण्णा हजारे यांच्या कार्यालयातील स्वीय सहाय्यक दत्ता आवारी यांनी सांगितले. याप्रकरणी पुण्यात चौकशी केल्यानंतर या नावाचा माणूस मनोरुग्ण असल्याचे काही जणांनी सांगितल्याचे आवारी म्हणाले. याप्रकरणी अद्याप पारनेर पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. (तालुका प्रतिनिधी)
हजारे यांना धमकी
By admin | Updated: July 25, 2014 00:25 IST