पोहेगावमध्ये पोलीस दूरक्षेत्र शासनाकडून मंजूर करण्याची मान्यता मिळवून दूरक्षेत्र चालू झाले. सुरुवातीला काही वर्षे शिर्डी पोलीस स्टेशन अंतर्गत दूरक्षेत्राचे दैनंदिन काम चालू झाले असता घरफोड्या व अवैध धंद्यांना आळा बसला. मात्र, गेल्या दोन-तीन वर्षांपासून शिर्डी पोलीस स्टेशनकडून अपुऱ्या कर्मचारी संख्येचे कारण देऊन आऊट पोस्ट बंद ठेवण्यात आले. गेल्या तीन ते चार वर्षांपासून पोहेगाव येथील पोलीस दूरक्षेत्र बंद आहे. सदर दूरक्षेत्राच्या अंतर्गत परिसरातील १० ते १२ गावांचा समावेश असून शिर्डी पोलीस स्टेशन कुठल्याही कर्मचाऱ्यांची नेमणूक करत नाही.
त्यामुळे पोहेगाव व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे, अनेक ठिकाणी चोरट्या मार्गाने खुलेआम बेकायदा दारू विक्री, मटका, जुगार, पाकीटमारी, भुरट्या चोऱ्या सुरू आहेत. त्यामुळे परिसरातील महिलांना विद्यार्थ्यांना व नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. शनिवारी गावातील एटीएम मशीन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. हाकेच्या अंतरावर असलेले आऊट पोस्ट चालू असते तर या घटना घडल्या नसत्या. अनेक वेळा हे आऊट पोस्ट चालू करण्यासाठी ग्रामपंचायतीने गाव बंद करत रास्ता रोको आंदोलनही केले.
............
पोलीस अधीक्षकांना निवेदन
सरपंच अमोल औताडे यांनी ग्रामसभा घेत सर्व निवेदने पोलीस अधीक्षकांना पाठवली. परिस्थितीची दखल अहमदनगर पोलीस अधीक्षक कार्यालयाने घेतली. किमान कर्मचाऱ्यांची नेमणूक करून दूरक्षेत्र सुरू करून पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करून अहवाल सादर करण्याची सूचनाही केली. मात्र, शिर्डी पोलीस स्टेशनकडून आता पोहेगाव दूरक्षेत्र केव्हा चालू होईल, याची प्रतीक्षा नागरिकांमध्ये वाढली आहे.