अहमदनगर : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत, आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या वाढवावी लागणार आहे. प्रतिबंधात्मक क्षेत्र जाहीर करून उपाययोजना गतीने राबविल्या पाहिजेत. कोरोना संसर्गास कारणीभूत ठरणाऱ्या आणि प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणाऱ्यास टाळाटाळ करणाऱ्या आस्थापना बंद करण्याची कठोर कारवाई करा, असे निर्देश नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी बुधवारी दिले आहेत. जिल्ह्याचा रुग्ण बाधित होण्याचा दर असाच वाढत राहिला, तर जिल्ह्यात पुन्हा प्रतिबंध लावावे लागतील, असा इशाराही त्यांनी बैठकीत दिला.
अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी विभागीय आयुक्त गमे यांनी जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय अधिकारी यांच्याशी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे, महावितरणचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित आदी उपस्थित होते.
बैठकीत गमे म्हणाले, जिल्ह्यात गर्दी जमविणाऱ्या कार्यक्रमांवर पथकांमार्फत लक्ष ठेवा. ठिकठिकाणी नाकाबंदी करावी. ज्या आस्थापना कोविडसुसंगत वर्तणुकीचे पालन करीत नाहीत, त्या बंद करण्याची कारवाई करावी. कोणत्याही प्रकारे कोरोना संसर्ग पसरण्यास कारणीभूत ठरणाऱ्या घटकांना सवलत देऊ नका. रुग्णसंख्या या प्रमाणात वाढत राहिली, तर त्याचा ताण आरोग्य यंत्रणेवर येणार आहे. त्यामुळे हा प्रादुर्भाव वेळीच आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना करा, असे त्यांनी स्पष्ट केले.
----
गर्दीचे कार्यक्रम बंद करा
जिल्ह्यात यापुढे गर्दी जमविणारे कार्यक्रम होणार नाहीत, याची दक्षता तालुकास्तरीय यंत्रणांनी घ्यावी. असे कार्यक्रम कऱणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन आणि साथरोग नियंत्रण कायद्यानुसार कारवाई करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले. जिल्हा रुग्णालयातील आरटीपीसीआर लॅबमध्ये पूर्ण क्षमतेने चाचण्या होतील, यादृष्टीने आरोग्य यंत्रणेने कार्यवाही करावी. दररोज होणाऱ्या चाचण्या, बाधित आदींची माहिती संबंधितांनी दररोज पोर्टलवर अपलोड करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
यापुढे सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत नाकाबंदी करून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक पाटील यांनी दिली.