चंद्रकांत शेळके, अहमदनगरविद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्याने टीईटीला नसलेला प्रतिसाद, त्यातच मागील वेळी पेपरफुटीमुळे परीक्षा रद्द करण्याची नामुष्की व आता पुन्हा फेरपरीक्षा घेण्यासाठी तारीख जाहीर केलेली असतानाच पुन्हा एकदा टीईटीला ग्रहण लागले आहे. ज्या दिवशी ही फेरपरीक्षा (१८ मे) होणार आहे, त्याच दिवशी मुक्त विद्यापीठांतर्गत कला, वाणिज्य शाखेच्या तृतीय वर्षाचा पेपर असल्याने आता ही टीईटी पुढे ढकलण्याची नामुष्की परिषदेवर ओढवणार आहे. परीक्षा परिषदेच्या वरिष्ठ पातळीवरून तसे प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्र शासन मान्यतेने परीक्षा परिषदेच्या वतीने १६ जानेवारी २०१६ रोजी शिक्षक पात्रता परीक्षेचे (टीईटी) आयोजन करण्यात आले होते. डीएडधारकांसाठी क्रमांक १ व बीएडधारकांसाठी क्रमांक २ असे वेगवेगळे दोन पेपर त्या दिवशी झाले. त्यानुसार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. परंतु नंतर यातील पेपर क्र.१ फुटल्यामुळे या विषयाचा पेपर रद्द करण्याची घोषणा परीक्षा परिषदेने केली. त्यानंतर तब्बल चार महिन्यांनी म्हणजे १८ मे २०१६ रोजी या विषयाची फेरपरीक्षा होणार असल्याचे प्रसिद्धीपत्रक परीक्षा परिषदेने काढले. परंतु याच दिवशी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठांतर्गत कला, वाणिज्य शाखेच्या द्वितीय व तृतीय वर्षांच्या अभ्यासक्रमाचे पेपर आहेत. टीईटी देणाऱ्या काही विद्यार्थ्यांचे प्रवेश याच अभ्यासक्रमाला असल्याने त्यांचा यापैकी एक पेपर बुडणार आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.टीईटीच्या फेरपरीक्षेचे वेळापत्रक जाहीर करताना परीक्षा परिषदेच्या लक्षात ही बाब आली नाही का, पेपरफुटीमुळे आधीच टीकेचे धनी झालेल्या परीक्षा परिषदेवर आता पुन्हा परीक्षेची वेळ बदलण्याची नामुष्की ओढवणार आहे. अन्यथा विद्यार्थ्यांचे नुकसान अटळ आहे.
टीईटी परीक्षेला पुन्हा ग्रहण !
By admin | Updated: April 20, 2016 23:41 IST