अहमदनगर : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शहरात ज्या कार्यरत असलेल्या दुकाने, आस्थापनांत काम करणाऱ्या मालकांसह कामगारांना चाचणी केल्याचे प्रमाणपत्र दाखविणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसा आदेश महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी मंगळवारी जारी केला.
शहरात महापालिकेने कठोर निर्बंध लागू करत मेडिकल, पेट्रोलपंप, घरपोहोच गॅस वितरण, बँका, दूध व दुग्धजन्य पदार्थ, पशुखाद्य आणि कृषी सेवा केंद्र सुरू ठेवण्याची मुभा दिली आहे. मात्र या दुकानांसमोर गर्दी होत असून, तेथून संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कार्यरत असलेल्या सर्व आस्थापनांचे अधिकारी, कर्मचारी व्यवस्थापक, मालक, कामगार यांनी महापालिकेच्या नजीकच्या आरोग्य केंद्रात अँटिजन चाचणी करून प्रमाणपत्र सोबत बाळगणे बंधनकारक करण्यात आले आहे. महापालिकेच्या दक्षता पथकाने भेट देऊन प्रमाणपत्राची मागणी केल्यास प्रमाणपत्र दाखविणे गरजेचे आहे. प्रमाणपत्र न दाखविल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा महापालिकेने दिला आहे.