अहमदनगर : दहावी-बारावीची परीक्षा ॲानलाईनऐवजी थेट परीक्षा केंद्रातच होणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केले असून अनेक पालकांनी या निर्णयाचे समर्थन केले आहे. कोरोनाबाबत सर्व खबरदारी घेऊन या परीक्षा व्हाव्यात. परंतु यंदा परीक्षा ठराविक केंद्राऐवजी जर आपापल्या शाळेतच घेतल्या तर विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या दृष्टीने ते सोईचे होईल, अशा प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केल्या आहेत.
राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पुन्हा लॉकडाउन होण्याची शक्यता शासनाने वर्तवली आहे. अशा स्थितीत दहावी व बारावीच्या परीक्षा होणार की, नाही याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात किंवा ऑनलाइन घेण्यात याव्यात, अशीही मागणी पुढे आली होती. परंतु दहावी-बारावी वर्ष विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील महत्वाची वर्षे असतात. त्यामुळे खबरदारी घेऊन दहावी-बारावीच्या परीक्षा प्रत्यक्ष केंद्रावरच होतील, असे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांच्यासह शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केले आहे.
कोरोनाची वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता या परीक्षा ऑफलाइन होणे योग्य आहे का? याबाबत ‘लोकमत’ने दहावी-बारावी विद्यार्थ्यांच्या पालकांशी संवाद साधला असता, बहुतेकांनी ऑफलाइन परीक्षा पर्यायाचे समर्थन केले. दहावी-बारावीसारख्या महत्वाच्या परीक्षांची तयारी विद्यार्थी वर्षभर करतात. त्याचे योग्य मूल्यमापन ऑनलाईन परीक्षेतून होऊ शकत नाही. प्रशासनाने योग्य खबरदारी घेऊन या परीक्षा घ्याव्यात. एकाच केंद्रावर गर्दी करण्यापेक्षा आपापल्या शाळेतच परीक्षा घेतली तर सोशल डिस्टंन्सिंग पाळले जाईलच, शिवाय प्रवासाचा वेळही वाचेल. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे आणखी सोईचे होईल.
--------------
दहावीची परीक्षा - २९ एप्रिल ते २० मे
विद्यार्थी - अंदाजे ७० हजार
बारावीची लेखी परीक्षा - २३ एप्रिल ते २१ मे
विद्यार्थी - अंदाजे ६४ हजार
---------------
दहावीच्या पालकांना काय वाटते...
दहावी-बारावी परीक्षेचे स्वरूप विचारात घेता परीक्षा ऑफलाइनच हव्यात. त्याशिवाय विद्यार्थ्यांचे योग्य मूल्यमापन होणार नाही. केवळ प्रशासनाने कोरोनाबाबत खबरदारी घेऊन विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी.
- अनिल सुद्रिक, पालक
---------
कोरोनाची त्या वेळची स्थिती पाहून शासनाने परीक्षेबाबत निर्णय घ्यावा. परंतु एकाच केंद्रावर परीक्षा घेण्याऐवजी आपापल्या शाळेत घेतली तर सोशल डिस्टंन्सिंग पाळले जाईल, शिवाय ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इतर केंद्रावर जाण्यासाठी प्रवासही करावा लागणार नाही.
- जगन्नाथ बोडखे, मुख्याध्यापक, राष्ट्रीय पाठशाळा
----------
कोरोनाच्या काळात सुरक्षिततेच्या दृष्टीने शिक्षणासाठी ॲानलाईन पर्यायच उत्तम आहे. परंतु दहावी-बारावीसाठी ते योग्य होणार नाही. त्यांच्या परीक्षा ॲाफलाईनच हव्यात. आतापासूनच अनावश्यक गर्दीवर कारवाई केली तर कोरोनाचा धोका कमी होईल. पर्यायी विद्यार्थ्यांना निर्भय वातावरणात परीक्षा देता येतील.
- विजय सानप, पालक
-----------------
बारावीच्या पालकांना काय वाटते...
मुलांनी वर्षभर तयारी केली आहे. परीक्षा प्रत्यक्ष केंद्रावर झाली तर योग्य मूल्यमापन झाल्याचे समाधान मुलांना वाटेल. पालकही योग्य काळजी घेऊन मुलांना पाठवतील.
- राजेंद्र जाधव, पालक
-----------
ग्रामीण भागात इंटरनेटची मोठी समस्या आहे. त्यामुळे ॲानलाईन परीक्षा देणे मुलांना शक्य होणार नाही. परीक्षा ही शाळेतच घेतली तर मुलांची मोठी सोय होईल. परीक्षा मंडळाने याचा विचार करावा.
- संतोष म्हस्के, पालक
-----------
प्रत्यक्ष केंद्रावर परीक्षा योग्य आहे. फक्त केंद्रावर सॅनिटायझर, तसेच इतर कोरोनासंदर्भात खबरदारी घेणे गरजेचे आहे. प्रत्येक पालकाने आपल्या पाल्याला केंद्रापर्यंत स्कूल व्हॅनमध्ये न पाठवता स्वता: सोडायला हवे.
- योगेश साठे, पालक
------
फोटो - २४एक्झाम