श्रीगोंदा : श्रीगोंदा फॅक्टरी येथील एका भटक्यांच्या वस्तीत राहणाऱ्या फिरस्ती कुटुंबातील सचिन काशिनाथ शिंदे हा श्रीगोंदा येथील सोनिया गांधी पाॅलिटेक्निकमध्ये मेकॅनिकलमध्ये इंजिनिअर झाला. त्याला पुणे येथील एका खासगी कंपनीत चांगल्या पॅकेजची नोकरी मिळाली आहे.
काशिनाथ शिंदे यांचे अकोला जिल्ह्यातील दाळंबी हे गाव. पोटाची खळगी भरण्यासाठी ते २०१४ रोजी श्रीगोंदा फॅक्टरी येथे आले. घरोघर फिरून स्टोव्ह, मिक्सर, गॅस शेगडी दुरुस्तीचा व्यवसाय त्यांनी सुरू केला. सचिनचे प्राथमिक शिक्षण दाळंबी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. त्यानंतर गावाजवळ असलेल्या कोळंबी येथे दररोज तीन-चार किलोमीटर पायी चालत ये-जा करून दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
दहावीला ७६.८० टक्के गुण मिळविले.
श्रीगोंदा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात अकरावीला प्रवेश घेतला. बारावी पासनंतर सचिनचे वडील नेमकेच सोनिया गांधी पाॅलिटेक्निकचे प्राचार्य अमोल नागवडे यांच्या घरी गॅस शेगडी दुरुस्तीच्या निमित्ताने गेले. नागवडे यांनी मुलांच्या शिक्षणाची विचारपूस केली आणि त्यांनी सचिनला झटपट नोकरी लागण्यासाठी मेकॅनिकल डिप्लोमा करण्याचा सल्ला दिला. सचिन डिप्लोमा ८६ टक्के गुणांसह उत्तीर्ण झाला. त्याला पुणे येथील एका कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी मिळाली.
काशिनाथ शिंदे यांचा दुसरा मुलगा अमितही पाॅलिटेक्निकमध्ये द्वितीय वर्षात शिकत आहे. तो ९१.२५ गुण घेऊन प्रथम आला आहे.
सचिनची मोठ्या कंपनीत निवड झाल्याबद्दल ढोकराईच्या जोशीवस्तीत आनंदोत्सव झाला. कुटुंबीयांनी साखर वाटून आनंद व्यक्त केला.
संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, अनुराधा नागवडे, निरीक्षक एस. पी. गोलांडे, प्राचार्य अमोल नागवडे, प्रा. सचिन जठार, विभागप्रमुख प्रा. मंगेश काळे आदींनी त्याचे कौतुक केले.
---
जिद्द, मेहनतीने अभ्यास केला. त्यामुळे यश मिळाले. नोकरी मिळाल्याने कुटुंबाला आता आधार मिळाला आहे. यशात आई, वडील, शिक्षकांचे मोठे योगदान आहे.
-सचिन काशिनाथ शिंदे,
राहुरी फॅक्टरी
---
११ श्रीगोंदा सचिन
पुणे येथील कंपनीत निवड झाल्याबद्दल ढोकराई येथील सचिन शिंदे याचे कौतुक करताना आई-वडील, छोटा भाऊ.