शेवगाव : तालुक्यातील नऊ गावात महापुराचा मोठा फटका बसला. चार-पाच वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान ठरलेलेच. त्यामुळे सांगा, आम्ही जगायचं तरी कसं? असा सवाल या गावांमधील पुराचा फटका बसलेले ग्रामस्थ करत आहेत. पाऊस थांबल्यानंतरही त्यांना पुन्हा संसाराचा गाडा सुरळीत करण्यात अनेक अडथळे येत आहेत.
पूरग्रस्तांना तातडीच्या मदतीची अपेक्षा होती. दहा-बारा दिवस झाले तरी अजूनही पूरग्रस्तांना तातडीची मदत मिळालेली नाही. मंत्र्याचे, पुढाऱ्यांचे सहानुभूती, पाहणी दौरे झाले. मात्र यातून पूरग्रस्तांच्या हाती काहीच लागले नाही. बँक खात्यात मदत जमा झाली तरी, पैसे काढण्यात अनेक अडचणी आहेत. अनेकांचे एटीएम कार्ड, पासबुक पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. सरकारकडून मदतीत होणाऱ्या दिरंगाईबद्दल पूरग्रस्तांकडून प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे
अगोदर पावसाने ओढ दिली. नंतर पाऊस आला; मात्र त्याने कहरच केला. घर, शिवार होत्याचं नव्हतं केलं. नंदिनी, नानीकाठच्या गावागावातील महापुराच्या व्यथा खळाळणाऱ्या डोळ्यातून वेदनांचा हिशोब मांडणाऱ्या कांताबाई बाबासाहेब शिंदाडे त्यांच्या घरातून होती नव्हती तेवढी जनावरे, भांडीही महापुराने वाहून गेलीत. धान्य, कपडेलत्ते भिजले. ओढवलेल्या प्रसंगामुळे स्वतःचे घर सोडून नातेवाईकांकडे आसरा घ्यावा लागला. सून माहेरी तर मुलगा अण्णासाहेब जवळच्या गावातील नातेवाईकांकडे. कांताबाई अन्य पाहुण्यांकडे आश्रयाला गेल्याने त्यांचे कुटुंब विखुरले आहे. अद्यापही कोणाचीही काडीची मदत मिळाली नाही, असे अण्णासाहेब शिंदाडे यांनी सांगितले.
अशीच पूरग्रस्त भागातील प्रत्येक घराघराची व्यथा दिसते. पूर ओसरून गेला. अजून गावात यायला धड वाटही नाही. वाड्या, वस्त्यांवर चिखलातून कशीबशी वाट काढत जावे लागते. नदीकाठच्या गावकऱ्यांना घराघरातून गाळ उपसणे मुश्कील झाले आहे. खांब वाहून गेल्याने वीजपुरवठा खंडित आहे. मंत्र्यांच्या दौऱ्यानंतरही वीज पुरवठा सुरळीत झाला नाही. त्यामुळे प्यायला पाणीही मिळेना.
असा प्रसंग यापूर्वी अनुभला नाही. पुराचा अनुभव लक्षात घेता आम्ही आळीपाळीने रात्री जागून सावधानता बाळगत आहोत; मात्र मनात भीती कायम आहे. शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. एक गाय वाहून गेली आहे, अशी व्यथा आखेगावचे शेतकरी अशोक काकडे यांनी मांडली.
-------
माझी दहा एकर शेती वाहून गेली आहे. शेतात दोन फूट गाळ साचला आहे. नुकसान प्रचंड झाले आहे. निसर्गापुढे काय करणार मात्र पाऊस सुरू झाला की भीती वाटते आहे. नुकसानभरपाई त्या तुलनेत मिळायला हवी.
-भगवान काटे,
शेतकरी, काटेवाडी.
----------
पूरग्रस्तांच्या भावना लक्षात घेऊन मदत द्यायला हवी. माझ्या सहा शेळ्यांचा मृत्यू झाला. पंधरा ते वीस खतांच्या गोण्यांचा चिखल झाला. बटाईने घेतलेले १३ एकर शेत वाहून गेले. गुडघ्याइतके खड्डे पडले आहेत. शेतात पीक न राहिल्याने कोणते पीक होते तेही कळत नाही. कोल्हापूर, सांगलीच्या धर्तीवर मदत मिळायला हवी. माझा अडीच लाख खर्च झाला आहे. आमदार मोनिका राजळे व हर्षदा काकडे यांनी धान्य व किराणा दिल्याने आधार मिळाला.
-संदीप गोर्डे,
शेतकरी
----
११ आखेगाव
पुरामुळे ओस पडलेले आखेगाव येथील घर.