अहमदनगर : जिल्हा परिषद आवारात आंतरजिल्हा बदलीसाठी सुरू असलेले प्राथमिक शिक्षकांचे आंदोलन मंगळवारी दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. दरम्यान, आंदोलनकर्ते आणि शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांची चर्चा झाली. यात आंदोलनकर्त्यांनी लेखी आश्वासनाची मागणी केली. मात्र, ती देण्यास असमर्थता दर्शवल्याने शिक्षकांनी आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार केला आहे. आंतरजिल्हा बदलीसाठी २०७ ना हरकत प्राप्त शिक्षकांनी सोमवारपासून जिल्हा परिषदेत सहकुटुंब उपोषण सुरू केले आहे. हे उपोषण मागे घ्यावे, यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे आणि आंतरजिल्हा बदली पात्र शिक्षकांच्या शिष्टमंडळात सोमवारी चर्चाही झाली होती. मात्र, यावेळी चर्चेला उपस्थित असणारे शिक्षक आणि आंदोलनकर्त्या शिक्षकांचा संबंध नसल्याचा दावा आंदोलनकर्त्या शिक्षकांनी केला आहे. सोमवारी रात्री ९ वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी बिनवडे, शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेवून त्यांना आंदोलनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलनकर्त्यांनी २०७ शिक्षकांना पदस्थापनेचा आदेश देण्याची मागणी केली. त्यावर बिनवडे यांनी आंतरजिल्हा बदली पात्र शिक्षकांची बिंदूनामावली तयार करून पेसा, नॉन पेसा आणि नाशिक येथील मागासवर्गीय कक्षातून यादी तपासून आणावी लागेल, असे स्पष्ट सांगितले. हे आंदोलनकर्त्या शिक्षकांना मान्य नसल्याने शिक्षकांचे उपोषण सुरूच आहे. (प्रतिनिधी)बनवाबनवी...आंदोलनकर्त्यांच्या वतीने प्रशासनासोबत चर्चा करण्यासाठी सहा शिक्षकांचा गट तयार करण्यात आला आहे. यात चंद्रकांत गट, सचिन झगडे, विकास निसळ, सोनाली रसाळ, सुनीता ढवळे, सुमती चौरे यांचा समावेश आहे. या शिक्षकांशिवाय प्रशासनाने आंदोलनाबाबत कोणाशीही चर्चा करून नये, अशी विनंती केली आहे. आंदोलनात स्त्रिया आणि लहान मुलांचा समावेश असून रात्रीच्यावेळी लाईट आणि स्वच्छता गृह उपलब्ध करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांच्यावतीने करण्यात आली आहे. ४सोमवारी दुपारी जिल्हा परिषदेत बनवाबनवीचा प्रकार घडला. आंदोलनकर्त्यांच्यावतीने जे शिष्टमंडळ बिनवडे यांच्याकडे चर्चेसाठी गेले होते, त्यात ना हरकत प्रमाणपत्र मिळालेल्या २०७ शिक्षकांपैकी एकही शिक्षक नव्हता. ज्यांना ना हरकत प्रमाणपत्र मिळालेले नाही, ते शिक्षक आमच्या बदल्याला विरोध करीत असल्याचा आंदोलनकर्त्यांनी आरोप केला आहे. यामुळे आंतरजिल्हा बदली पात्र शिक्षकांची बनवाबनवी सुरू असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात मोठे अर्थकारण सुरू असल्याची चर्चा दिवसभर जिल्हा परिषदेच्या वर्तुळात सुरू होती.
दुसऱ्या दिवशी शिक्षकांचे आंदोलन सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2016 23:10 IST