जामखेड/खर्डा : जामखेड तालुक्यातील खर्डा येथील शिवकृपा दूध संकलन केंद्रातून बारामती येथे टँकरद्वारे गेलेले ८ हजार ४९७ लिटर भेसळयुक्त दूध पुणे येथील अन्न व औषध प्रशासनाने जप्त केले. या दुधाची किंमत २ लाख २९ हजार ४१९ रुपये आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. ९) दुपारी करण्यात आली.
खर्डा येथून दुधाच्या टॅंकर (एम.एच ११/ ए.एल ५९६२) मधून सुमारे ८ हजार लिटर भेसळयुक्त दूध येणार असल्याची माहिती पुणे येथील अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार परिमंडळ ५ चे सहायक आयुक्त (अन्न) अर्जुन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी शुभांगी अंकुश, बालाजी शिंदे आणि पुणे जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास मंडळाचे राजेंद्र कांबळे यांच्या पथकाने बारामती येथे दुधाचा टँकर पकडून जप्त केला. टँकरचालक संपत भगवान नन्नवरे यांच्याकडे चौकशी केली असता त्याने जामखेड तालुक्यातील खर्डा येथील शिवकृपा दूध संकलन केंद्राचे दूध असल्याचे सांगितले. पथकातील अधिकाऱ्यांनी दुधाची तपासणी केली. तेव्हा दूध भेसळयुक्त तसेच कमी दर्जाचे असल्याचे तपासणीतून पुढे आले. त्यामुळे दुधाचा नमुना घेऊन उर्वरित २ लाख २९ हजार ४१९ रुपयांचे ८ हजार ४९७ लिटर दूध बारामती नगरपरिषदेच्या मैदानावर नष्ट करण्यात आले.
----
अशी करतात भेसळ..
शेतकरी संकलन केंद्र, खासगी संस्था यांना दूध घालतात. संस्थाचालक दुधाच्या फॅटप्रमाणे प्रतिलिटर दूध ठरवतात. फॅट कमी असल्यास संस्थाचालकच दुधात पावडर भेसळ करतात. पामतेल, युरिया, मिठाचा वापर करून भेसळयुक्त दूध तयार केले जाते, असे अनेकदा समोर आले आहे. त्यातच दूध संस्था चालविणारे बहुसंख्य चालक विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आहेत. त्यामुळे त्यांना कारवाईपासून अभय मिळत असल्याचे दिसते.