अहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील उपआरोग्य केंद्रातील समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. गणेश शेळके यांनी लसीकरण केंद्रातच मंगळवारी आत्महत्या केली. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याची त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यामुळे चिठ्ठीत नावे असलेल्या वरिष्ठांची चौकशी केली जाईल. याप्रकरणी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भागवत दराडे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे, अशी माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. अन्य जिल्हाधिकाऱ्यांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांचाही चिठ्ठीत उल्लेख असला तरी त्यांचा या आत्महत्येशी संबंध आहे, असे वाटत नाही. तरीही त्या दृष्टीनेही चौकशी केली जाईल, असे पालकमंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. तालुका आरोग्य अधिकारी व डॉ. शेळके यांची दूरध्वनीवर चर्चा झाली होती, तसेच पगार काढणारा कर्मचारी रजेवर असल्याने त्यांचा पगार दिला गेला नाही, अशी माहिती समोर आली आहे. याची सर्व चौकशी होईल, असेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.
--------
समुदाय अधिकाऱ्यांवर कामाचा ताण
पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील उपकेंद्रावर समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून डॉ. गणेश शेळके यांची नियुक्ती करण्यात आली होती. असे जिल्ह्यात ३९७ अधिकारी आहेत. आरोग्य विज्ञान विद्यापीठाने त्यांच्या परीक्षा घेतल्या होत्या. त्यांची नियुक्ती झाल्यानंतर कोरोना सुरू झाला. त्यामुळे ग्रामीण भागात समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या कोविड सेंटरवर करण्यात आल्या. कोरोनामुळे अशा सर्व समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना २४ तास काम करावे लागत आहे. प्रशासनावरील इतर ताणाप्रमाणे त्यांच्यावर ताण होता. त्यांना २५ हजार रुपये अधिक १५ हजार रुपये इन्सेटिव्ह असा पगार दिला जात होता. मात्र, दोन महिन्यांपासून पगार दिला गेला नसल्याचे समोर आले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली. जिल्ह्यात ग्रामीण भागातील ५५५ उपकेंद्र आहेत. अशा केंद्रांवर ३९७ समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यापैकीच एक डॉ. शेळके होते, असे क्षीरसागर यांनी सांगितले.
----------
जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन
जिल्ह्यातील समुदाय अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी आंदोलन केले. पालकमंत्र्यांना भेटण्यासाठी आलेल्या डॉक्टरांना पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारातच अडविले. त्यामुळे डॉक्टरांनी घोषणा दिल्या. डॉ. गणेश शेळके यांना प्रशासनाने दिलेल्या त्रासामुळेच त्यांनी आत्महत्या केली. याबाबत आरोग्य अधिकाऱ्यांना माहिती दिली होती. मात्र, याबाबत कार्यवाही झाली नाही. तीन महिन्यांपासूनचे मानधन त्यांना दिले नव्हते. ताणतणाव व मानधन न दिल्याने त्यांची आर्थिक हानी याला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असल्याचे संघटनेने पत्रकात म्हटले आहे. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. शैलेश पवार, डॉ. संदीप गायकवाड, सचिव अक्षय पठारे, डॉ. जयदीप काळे, संकेत पोटे यांच्यासह दोनशेच्या वर डॉक्टर उपस्थित होते. पालकमंत्र्यांना भेटू द्यावे, यावरून त्यांची व पोलीस यांच्यात वाद झाले.
--फोटो
०७ कलेक्टर ऑफिस् २,३
समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर डॉ. गणेश शेळके यांच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्यांची चौकशी करून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. यावेळी प्रशासनाचा निषेधही करण्यात आला. (छायाचित्र- साजीद शेख)