तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन शिंदे यांनी लोकमतला दिलेल्या माहितीनुसार शहरात म्युकरमायकोसिसचे आतापर्यंत नऊ रुग्ण आढळून आले. यातील काही जण नगर, औरंगाबाद, नाशिक येथे उपचार घेत आहेत. तर एका रुग्णावर साखर कामगार रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. हा रुग्ण सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे.
रुग्णालयात डॉ. प्रणयकुमार ठाकूर, डॉ. गणेश जोशी, डॉ. शरद सातपुते, डॉ. ऋतुजा जगधने यांनी ही यशस्वी शस्त्रक्रिया केली. रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती साखर कामगार रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र जगधने यांनी दिली. तसेच दोघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह असल्याने त्यांना उपचारासाठी औरंगाबाद येथे पाठविल्याचेही त्यांनी सांगितले. म्युकरमायकोसिस हा आजार झालेल्या रुग्णांना त्यांच्या आजारातील तीव्रतेनुसार अमफोनेक्स हे इंजेक्शन दिले जाते. मात्र, या इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे.
कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आहे व ज्यांना म्युकरमायकोसिस हा आजार झालेला आहे, अशाच रुग्णांवर साखर कामगार रुग्णालयात उपचार केले जाणार आहेत.
म्युकरमायकोसिस या आजारावर शहरात उपचार होऊ शकतात. त्यामुळे या आजाराच्या रुग्णांना दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, रुग्णांनी म्युकरमायकोसिसची लक्षणे दिसताच जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा, वेळेवर निदान झाल्यास पुढील गुंतागुंत टाळता येते व रुग्ण लवकर बरा होऊ शकतो, असा विश्वास डॉ. प्रणय कुमार यांनी व्यक्त केला.