लोणी : कृषी, शिक्षण, आरोग्य क्षेत्रांच्या पायाभूत बळकटीकरणासाठी केलेल्या भरीव तरतुदीमुळे ग्रामीण विकासाला मोठ्या संधी मिळणार आहेत.‘शेतकऱ्यांचे भले आणि आरोग्य हित’ जोपासणारा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया भाजपचे ज्येष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केली. एक हजार बाजार समित्या ऑनलाईन पद्धतीने जोडण्याच्या निर्णयाचे स्वागतच असल्याचे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पातून सामान्य माणसाला नवी ऊर्जा देण्याचा प्रयत्न आहे. कृषीप्रधान देशातील शेतकऱ्यांना १६.५ लाख कोटी रुपयांच्या कृषी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवतानाच, शेतीपूरक व्यवसाय, सिंचन, मत्स्य, पोल्ट्री उद्योगांना चालना देण्यासाठी भरीव निधीची तरतूद केली आहे. ग्रामीण भागात अद्ययावत १५ हजार शाळांची उभारणी आणि शंभर सैनिकी शाळा सुरू करण्यास प्राधान्य,आदिवासी भागात ७५० एकलव्य शाळा सुरू करण्याचा निर्णय महत्त्वाचा आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना १० वी नंतर शिष्यवृत्ती देण्याची घोषणा स्वागतार्ह आहे. आरोग्य सुविधांवर अर्थसंकल्पात २ लाख २३ हजार कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे, असे विखे म्हणाले.