प्रतीक्षा... प्रत्यक्ष शाळा सुरू होण्याची
संदीप घावटे
देवदैठण : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सलग दुसऱ्या शैक्षणिक वर्षात शाळा, महाविद्यालये बंद असून ती सुरू होऊ शकली नाहीत. शाळा बंद आहेत, पण शिक्षण ऑनलाईन पद्धतीने सुरू ठेवण्याची कसरत चालू असून शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनातही अडचणी येत आहेत. विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणात अनेक अडथळे येत असल्याने शालेय विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षणात मन रमेनासे झाले आहे.
बऱ्याचवेळा श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण व परिसरामध्ये मोबाईल रेंज गायब असते किंवा रेंज पुरेपूर मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचे धडे गिरवता येत नाहीत. तसेच अनेक पालक सुरुवातीच्या काळात ऑनलाईन शिक्षणासाठी हौसेने मोबाईल विद्यार्थ्यांच्या हाती देत होते. पण आता पालकही मुलांसाठी मोबाईल उपलब्ध करून देत नाहीत. ज्यांच्याकडे मोबाईल आहेत, अशी मुले मोबाईलचा उपयोग शिक्षणासाठी कमी व गेमसाठीच जास्त करत आहेत. त्यामुळे त्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर विपरित परिणाम होऊ शकतो.
काही पालक मोलमजुरी करणारे आहेत, तर काहींचे हातावर पोट आहे, असे पालक पाल्यांना शिक्षणासाठी मोबाईल घेऊ शकत नाहीत. असे अनेक अडथळे ऑनलाईन शिक्षणात येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे.
देवदैठण परिसरातील अनेक गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांकडे मोबाईल नाहीत. त्यामुळे ते ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहत आहेत. म्हणून प्रत्यक्ष शाळा सुरू होण्याची ते प्रतीक्षा करत आहेत.
गतवर्षीपेक्षा यावर्षी ग्रामीण भागातील विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणात जास्त रस दाखवत नसून आपण शिकवलेले विद्यार्थी कितपत ग्रहण करतात, याचे मूल्यमापन करण्यात शिक्षकांनादेखील अनेक अडचणी येत आहेत. ऑनलाईन परीक्षा घेत असताना विद्यार्थ्यांचे तंतोतंत मूल्यमापन होऊ शकत नसल्याची खंत शिक्षक बोलून दाखवत आहेत.
310821\screenshot_20210827_124137.jpg
संग्रही छायाचित्र