देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील घोड नदीच्या काठावर वसलेल्या छोट्याशा दाणेवाडीमधील जिल्हा परिषदेच्या शाळेत बोलक्या भिंतींमुळे खेळता खेळता विद्यार्थी शिकू लागले आहेत. पालक, शिक्षक यांच्या संकल्पनेतून कोरोनामुळे हा उपक्रम राबविला जात आहे.
मागील वर्षापासून कोरोनाच्या साथीमुळे सर्व शाळा बंदच आहेत. शाळा बंद झाली तशी पालकांचीही चिंता वाढली. संपूर्ण दिवसभर मुलांनी गजबजून जाणारी दाणेवाडीची शाळाही बंदच पडली. ऑनलाईन तासाला मोबाईलला रेंज नसणे, वीटभट्टीवरील मुलांच्या पालकांकडे मोबाईल नसणे यामुळे मुले शिक्षणापासून वंचित राहत होती.
कोरोना अन् शिक्षण या दोन चिंता येथील पालक अन् शिक्षकांनाही पडली. यावर काय उपाय करता येईल यासाठी पालकांची शिक्षकांनी शाळेत सभा घेतली. गावच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी शाळा आहे. सुट्ट्यांमुळे मुले दिवसभर शाळेतच खेळात रमलेली असतात. शिक्षकांनी पालकांसमोर एक कल्पना मांडली. मुले शाळेत खेळता खेळताही शिकू शकतात. त्यासाठी शाळेच्या भिंतीच बोलक्या करू. त्यानुसार आवारातील गोलाकार फळे व सर्व भिंतीवर सर्व वर्गांचा अभ्यासक्रम, पाढे, स्पेलिंग, चित्ररूप गोष्टी अगदी आकर्षक रंगात चिमुकल्यांच्या डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. त्यासाठी झालेला खर्च दीड लाख रुपयांचा निधी लोकवर्गणीतून एकाच दिवसात जमा झाला. मुले शाळेत रमायला लागली. खेळता खेळता वाचू लागली अन् लिहू लागली. शाळेच्या भिंती व फळे हीच त्यांची पुस्तके बनली. सर्व वर्गांचा अभ्यासक्रम त्यांना भिंतीवरच दिसू लागला.
----
संकल्पनेसाठी यांचे मिळाले सहकार्य
ही संकल्पना साकारण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अहिलू थेऊरकर यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांना अनिल गव्हाणे, सेवा संस्थेचे अध्यक्ष आप्पा रसाळ, युवराज थेऊरकर, गणपत मांडगे, सावळेराम रसाळ, भिवाजी मांडगे, सागर ढवळे, दिलीप थेऊरकर, धुराजी थेऊरकर, चंद्रकांत मांडगे, जालिंदर गव्हाणे, नंदू गव्हाणे यांनी सहकार्य केले. शाळा बोलकी व आकर्षक करण्यासाठी शाळेच्या उपक्रमशील मुख्याध्यापिका अलका भालेकर, शिक्षक बाळासाहेब गायकवाड, रावसाहेब दरेकर, सुलोचना तोरडमल यांनी मेहनत घेतली.---
फोटो दोन
१९ दाणेवाडी शाळा, १
दाणेवाडी शाळेतील भिंतींवर अशाप्रकारे अभ्यासक्रम, पाढे, स्पेलिंग, चित्ररूप गोष्टी साकारण्यात आल्या आहेत.
190621\img_20210619_124819.jpg
श्रीगोंदा तालुक्यातील दाणेवाडी येथील जिल्हा परीषद प्राथमिक शाळा बोलक्या भिंतीमुळे सजीव झाली आहे ( छायाचित्र - संदीप घावटे )