अहमदनगर : कोपरगाव येथील पूजा लोंढे या तीन महिन्यांच्या गरोदर मातेला तिच्या सासरी जाळून मारणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, तसेच यातील उर्वरित आरोपींना अटक करावी, अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने प्रदेश सचिव नित्यश्री नागरे यांनी केली आहे. शनिवारी (दि.२१) त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली.
नागरे यांनी निवेदनात म्हटले आहे, कोपरगाव येथील सासर असणाऱ्या पूजा लोंढे हिचे माहेर सिन्नर आहे. ती सासरी असताना गरम पाणी पडून ती भाजली आहे, असे तिच्या आई-वडिलांना तिच्या सासरच्या नातेवाइकांनी कळविले होते. तिचे आई-वडील रुग्णालयात पोहोचले तर डॉक्टरांनी ती जळाल्यामुळे ९५ टक्के भाजली असल्याचे सांगितले. ती त्यावेळी तीन महिन्यांची गरोदर होती. त्यामुळे याप्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी तिच्या आई-वडिलांनी केली होती. दरम्यान पोलिसांनी यातील दोघा आरोपींना अटक केली. मात्र, या आरोपींवर गर्भपातप्रकरणी कलम ३१३, हत्या केल्याप्रकरणी ३०२, पुरावे नष्ट केल्याप्रकरणी २०१ कलमान्वये कारवाई करावी तसेच उर्वरित आरोपींना अटक करावी, अशी मागणी नागरे यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. यावेळी पोलीस अधीक्षक पाटील यांनी ही घटना गंभीर असून, कायदेशीरदृष्ट्या योग्य कारवाई केली जाईल, असे आश्वासन नागरे यांना दिले.
...............
सुप्रिया सुळेंचा पाठपुरावा
दरम्यान नागरे यांनी पूजा लोंढे हिच्या आई-वडिलांची सिन्नर येथे जाऊन भेट घेतली व सांत्वन केले. तसेच घटनेची माहिती घेतली. त्यानंतर नागरे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचीही भेट घेऊन या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यासाठी पाठपुरावा करण्याची विनंती केली. त्यानंतर खासदार सुळे यांनीही जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि ही घटना गंभीर असल्याने आरोपींवर कडक कारवाई व्हावी, अशी सूचना केली.
...........
२१ सुप्रिया सुळे