रविवारी (दि. ११) संगमनेर तालुक्यातून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी स्वाक्षरी करीत इंधन दरवाढविरोधी मोहिमेत सहभाग घेतला. केंद्र सरकारविरोधात एक कोटी नागरिकांच्या सह्यांचे निवेदन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना देण्यात येणार आहे.
युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे म्हणाले, मोदी सरकार हुकूमशाही आहे. पेट्रोल-डिझेल व गॅसची दरवाढ करून केंद्र सरकार सर्वसामान्यांची लूट करीत आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीतून ३५ ते ४० टक्के लूट होत आहे.
थोरात म्हणाले, केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना भाजपची मंडळी सातत्याने किरकोळ दरवाढीविरोधात आंदोलन करीत होती. त्या वेळेस किमती अगदी मर्यादित होत्या. मात्र, आता कच्च्या तेलाची किंमत आंतरराष्ट्रीय पातळीवर अत्यंत कमी असतानासुद्धा मोदी सरकारने पेट्रोल-डिझेल व गॅसच्या दरात भरमसाट वाढ केली आहे. त्यावेळी आंदोलन करणारे आता मूग गिळून का बसले आहेत?